शेतमालाच्या दरात वाढ; शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान

तूर ३०० तर चणा २०० रुपयांनी वाढला

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
कारंजा लाड, 
Increase in agricultural prices येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील स्व. प्रकाश उत्तमराव डहाके मार्केट यार्डमध्ये ७ एप्रिल रोजी पार पडलेल्या लिलावात विविध शेतमालांच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून बाजारात असलेल्या चढ-उतारानंतर मिळालेल्या या दरवाढीमुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी प्रमुख पिकांमध्ये गहू, चणा आणि सोयाबीन या शेतमालांना चांगला प्रतिसाद मिळाला. गव्हाला किमान २२०० रुपये, सरासरी २२८५ रुपये तर कमाल २३४५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून्र तब्बल ६५०० क्विंटलची आवक नोंदविण्यात आली. चण्यालाही ४९६५ ते ५३०० रुपये प्रति क्विंटल असा समाधानकारक दर मिळाला.
 
 

tyr 
 
 
सोयाबीनचे दर ५०५० ते ५६५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले असून्र सुमारे ३५०० क्विंटल आवक झाली. याशिवाय तूर, उडीद, मुग, ज्वारी, बाजरी यांसारख्या इतर शेतमालांनाही अपेक्षित दर मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. बाजारात आवक चांगली असतानाही दर टिकून राहणे हे शेतकर्‍यांसाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत. दरम्यान, बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, काही सोयाबीन (बिजवाई) प्रकारांना यापेक्षा अधिक दर मिळत असला तरी हे दर स्थिर नसतात. त्यामुळे शेतकर्‍यांनी विक्री करताना बाजारस्थितीचा योग्य अभ्यास करून निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्च भागविण्यास मदत होणार असून, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानीला सामोरे गेलेल्या शेतकर्‍यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळणार आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तीचा फटका आणि दुसरीकडे वाढते उत्पादन खर्च या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी बाजारातील ही दरवाढ दिलासादायक ठरत आहे. एकूणच, कारंजा बाजार समितीतील वाढते दर आणि स्थिर बाजारस्थितीमुळे आगामी काळातही शेतमालाला योग्य दर मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून शेतकर्‍यांनी योग्य वेळ साधून शेतमाल विक्री करावी, असा सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे.