वर्धा,
washout-campaign : जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी सोमवार ६ रोजी पहाटे ४ वाजतापासून या सर्व गावठी दारूभट्टींवर एकाचवेळी छापेमारी करून नियोजनबद्ध वॉशआउट मोहीम राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यात १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचा दारूसाठा आणि इतर साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले.
पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या मोहिमेची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मागील पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारूभट्ट्यांच्या ठिकाणी, विशेषतः शहरालगतचा परिसर तसेच गावाबाहेर, जंगल शिवारात आणि जाण्या-येण्यास अडचणीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गोपनीय पाळत ठेवण्यात आली.
पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या नेतृत्त्वाखाली, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या देखरेखित जिल्ह्यांतील ४ उपविभागीय पोलिस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे २५१ पोलिस अंमलदार यांची १९ पोलिस ठाण्यांत वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पहाटे ४ वाजतापासून या सर्व गावठी दारूभट्टीच्या ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत ११० आरोपींवर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले.
या अचानक केलेल्या वॉशआऊट मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये, म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई करण्यात आली आहे, असे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सांगितले.