किडंगीपारच्या दारूमुक्तीच्या लढ्याला गालबोट

- गावकर्‍यांचा पोलिसांवर दगडफेक : पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
गोंदिया, 
kidangipar-alcohol-free : आमगाव जवळील किडंगीपार येथील दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीला घेऊन सुरू असलेल्या येथील नागरिकांच्या आंदोलनाला सोमवारी ६ एप्रिल रोजी गालबोट लागले. येथील आंदोलकावर प्रतिबंधक कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच संतप्त गावकर्‍यांनी सायंकाळी दगडफेक केली. ज्यामध्ये काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. यावर बचावासाठी पोलिसांकडूनही सौम्य लाठीचार्ज करण्यात आले.
 
 
JK
 
 
 
किडंगीपार येथील दारू दुकानामुळे ग्रामस्थांचे आरोग्य आणि शांतता धोक्यात आल्याचा आरोप करत येथील गावकर्‍यांनी २० मार्च रोजी तहसील कार्यालयावर धडक देत १० एप्रिलपर्यंत दारू दुकान बंद न झाल्यास ‘रस्ता, रेल्वे रोको आंदोलन’ व ‘सामूहिक आत्मदहनाचा’ इशारा दिला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आमगाव पोलिसांकडून आंदोलनाचा नेतृत्व करणार्‍या किडंगीपार येथील संतोष दोनोडे यांना प्रतिबंधात्मक कारवाईचे नोटीस बजावण्यासाठी ५ एप्रिल रोजी पोलिस पथक त्यांच्या घरी गेले होते. मात्र, दोनोडे व त्यांच्या कुटूंबीयांनी नोटीस न स्विकारता पोलिसांसमोरच नोटीस फाडले व धक्का देत घराबाहेर काढले. दरम्यान, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोनोडे व त्यांच्या कुटूंबावर गुन्हा नोंद करून ६ एप्रिल रोजी त्यांना ताब्यात घेण्यासाठी पुन्हा पोलिस पथक त्यांच्या घरी गेले असता संपूर्ण कुटुंब फरार झाले होते. यावर पोलिसांनी कुटूंबीयांचा शोध घेत गावातूनच त्यांना अटक केली.
 
 
त्यामुळे संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी पोलिसांवर दगडफेक करत कारवाईचा विरोध केला. ज्यामध्ये काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. यावेळी आपल्या बचावासाठी पोलिसांनीही सौम्य लाठीचार्ज केला. याघटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता गावात अधिकचे पोलिस कुमक पाचारण करण्यात आले. त्यामुळे गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. त्यात आज, मंगळवारी ७ एप्रिल रोजी दोनोडे व त्यांची पत्नी, मुलगी यांना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही तीन दिवसापर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आले असल्याची माहिती आहे. मात्र, या सर्व प्रकारात दारूमुक्तीसाठी उभारलेल्या गावकर्‍यांच्या आंदोलनाला गालबोट लागले असून १० एप्रिल रोजी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.