पुणे,
kailash-satyarthi : यंदाचा प्रतिष्ठेचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026’ नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे. ही घोषणा हृदयनाथ मंगेशकर यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
हा मानाचा पुरस्कार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त २४ एप्रिल रोजी पुण्यात प्रदान केला जाणार आहे. हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार असून, देशातील नामवंत व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित केले जाणार आहे.
या वर्षी संगीत, नृत्य, नाटक, चित्रपट, साहित्य, पत्रकारिता आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. गायक महेश काळे, अभिनेते सुबोध भावे, प्राजक्ता माळी आणि रवीना टंडन यांचाही सन्मान होणार आहे. तसेच साहित्यातील योगदानासाठी अच्युत गोडबोले, पत्रकारितेसाठी सुशील कुलकर्णी, तर समाजकार्यासाठी आनंद भागवत यांना पुरस्कार दिला जाणार आहे.
या कार्यक्रमात ‘मोहन वाघ पुरस्कार’ उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी ‘भूमिका’ या नाटकाला प्रदान केला जाणार आहे. या नाटकात सचिन खेडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्स यांच्या वतीने, सकाळ मीडिया समूहाच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित केला जातो. कला, साहित्य आणि समाजकारणात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याची ही परंपरा आहे.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे “मी लता दीनानाथ…” हा संगीत कार्यक्रम असणार आहे. लता मंगेशकर यांच्या अजरामर गीतांना या कार्यक्रमातून आदरांजली वाहिली जाणार आहे. विविध गायक-गायिका या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहेत.
हा भव्य सोहळा २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिर येथे पार पडणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ कराड उपस्थित राहणार आहेत.