तेहरान,
Mojahedin Khamenei unconscious मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण मधील सत्ताकारणाबाबत चिंताजनक घडामोडी समोर येत आहेत. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचा दावा एका परदेशी वृत्तात करण्यात आला आहे. ते सध्या बेशुद्ध असून कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या स्थितीत नसल्याचे गुप्तचर माहितीद्वारे सूचित करण्यात आले आहे.
शासनकारभारापासून सध्या दूर
माहितीनुसार, कोम येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत इराणकडून कोणतेही अधिकृत विधान अद्याप समोर आलेले नाही. अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या परिस्थितीत ते शासनकारभारात सक्रिय भूमिका बजावू शकत नाहीत. दरम्यान, कोम हे शिया पंथासाठी अत्यंत महत्त्वाचे धार्मिक केंद्र मानले जाते. ते राजधानी तेहरानपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी सर्वोच्च नेत्यांच्या वास्तव्याबाबत माहिती समोर येणे ही अत्यंत दुर्मीळ बाब मानली जाते.
फेब्रुवारी अखेरीस झालेल्या अमेरिका-इस्रायल हल्ल्यानंतर इराणमधील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. त्या हल्ल्यात माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते, तसेच त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही जीव गमवावा लागला. या घटनेनंतर मोजतबा खामेनी यांची उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर मात्र ते सार्वजनिकरीत्या फारसे दिसले नाहीत. त्यांच्या नावाने निवेदने प्रसारित होत असली तरी त्यांच्या आवाजाची कोणतीही ध्वनिमुद्रित नोंद समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत शंका अधिक गडद होत आहेत. दरम्यान, इराण सरकारने नव्या नेतृत्वावर पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा कायम ठेवला आहे. तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या प्रकृतीबाबत आणि निर्णयक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.