अर्जुनी मोरगाव,
navegaon-dam-reservoir : निसर्गप्रेमींचे नंदनवन समजल्या जाणार्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील जलाशय आता पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. विदर्भाच्या पूर्व टोकावर वसलेल्या आणि चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेल्या या ३ हजार एकर विस्तीर्ण जलाशयात बुधवारी ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता भव्य ‘नौकाविहार’ (बोटींग) सुविधेचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आले आहे.

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या या जलाशयात पर्यटकांना आता पायडल बोट, बॅटरी बोट आणि आलिशान हाऊस बोटचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत हे संकुल सज्ज झाले असून, यामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी गती मिळणार आहे. केवळ नौकाविहारच नव्हे, तर या परिसरातील राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय पर्यटकांच्या प्रवासाला अधिक सुखद बनवत आहे. या नौकाविहाराचे उद्घाटन राज्यसभा खा. प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आदिवासी राज्यमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनील नाईक राहतील. यावेळी खा. प्रशांत पडोळे, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कसे पोहचता येईल...
गोंदिया-चंद्रपूर मार्गावरील देवलगाव रेल्वे स्थानकापासून अवघ्या १ किमी अंतरावर नवेगावबांध असून गोंदिया (बिरसी) विमानतळापासून ७० किमी, तर नागपूर विमानतळापासून १३० किमी अंतरावर आहे. त्याचबरोबर नागपूर-कोलकाता महामार्गावरील कोहमारा येथून केवळ २० किमी. अंतरावर हे स्थळ असून नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.