वेध
चंद्रकांत लोहाणा
pakistan आजपर्यंत भारतासोबत केलेल्या सर्वच युद्धांमध्ये पाकिस्तानने सपाटून मार खाल्ला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये तर भारताने पाकिस्तानात घुसून निर्धारित लक्ष्याचे अवघ्या काही मिनिटामध्ये चिथडे उडविले. एकदा मार खाऊनही बेशरम पाकिस्तानची खुमखुमी अजूनही जिरली नाही. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोट येथे कोलकाता शहरावर दिलेल्या हल्ल्याच्या धमकीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले असून, नापाक पाकिस्तानच्या अंताचा तर हा अध्याय नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानी नेत्यांची झोप उडाली होती. हे ऑपरेशन थांबविण्यासाठी त्यांनी अमेरिकेपुढे लोटांगण घातले होते. हे उघड सत्य असून, जगालाही माहीत आहे. त्यामुळे पाकिस्तानने यापुढे कोणतीही केलेली आगळिक त्यांच्या विनाशाचे कारण ठरू शकते. पाकिस्तानी नेते जुन्या भारताची स्वप्नं बघून जर जगत असतील तर त्यांना केवढी मोठी किंमत चुकवावी लागेल, हे त्यांच्या कल्पनाशक्तीच्याही पलिकडे असेल.

संपूर्ण जगामध्ये दहशतवादाचे माहेरघर असलेला पाकिस्तान आज आपल्याच कर्मफळाच्या भोगाने सर्वच आघाड्यांवर मार खात आहे. जगामध्ये भीक मागून देश चालविण्याची पाळी पाकिस्तानवर आली आहे. आपल्या जनतेला दिवसाकाठी एकवेळचे पोटभर अन्न देण्याचीही क्षमता या देशाची राहिली नाही. अमेरिका आणि इराणच्या युद्धानंतर तर पाकिस्तानमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशामध्ये सात दिवस पेट्रोल आणि डिझेल पुरेल एवढाही साठा त्यांच्याजवळ नाही. पाकिस्तानमध्ये आजमितीस पेट्रोल 460 रुपये लिटर आणि डिझेल 500 रुपये लिटर विकले जात आहे. मुजोर पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच बाबतीत आघाडी घेतली आहे. काँग्रेसने या देशामध्ये आणलेली स्वाभिमानशून्यता पूर्णतः पुसून नरेंद्र मोदी यांनी या देशाची खरी ओळख जगाला करून दिली. त्यामुळे पाकिस्तान आज कितीही फुशारकी मारत असला तरी आतून तो भयभीत झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या केवळ नावानेही पाकिस्तानी नेत्यांच्या अंगामध्ये कापरे भरत असले तर त्याचे नवल वाटायला नको. नेमक्या याच भीतीने पाकिस्तानची त्रेधातिरपीट उडाली आहे. नव्या शक्तिशाली भारतापुढे पाकिस्तानने आयुष्यभर पोसलेल्या दहशतवानेही नांग्या टाकल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नेते ख्वाजा आसिफ सारखी बेताल वक्तव्ये करून संपूर्ण जगामध्ये आपले हसे करून घेत आहेत. पाकिस्तानने जो मार्ग स्वीकारला आहे, त्या मार्गावर भविष्यामध्ये पाकिस्तानचा अंत निश्चित आहे.
मुळात पाकिस्तानचा जन्मच द्वेषापायी झाला आहे. त्यामुळे हा द्वेषाग्नी त्यास भस्म केल्याविना शांत बसणार नाही. खरं तर पाकिस्तान भारताशी कोणत्याही क्षेत्रामध्ये बरोबरी करू शकत नाही. याची जाणीव पाकिस्तानलाही आहे. तरीही पाकिस्तान सुधरत नसेल तर दोष कोणाला द्यायचा. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यावर त्यांनी पाकिस्तानला सुधारण्याची अनेकदा संधी दिली. स्वतःहून प्रयत्नही केले. परंतु, पाकिस्तानला ती भाषा कळली नाही. ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखल्यावर पाकिस्तान मात्र, मोदी यांना ओळखण्यास कमी पडला. काँग्रसने देशाची फाळणी केली. नेहरूंनी काहीही कारण नसताना काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेऊन तो चिघळत ठेवला. काँग्रेसची अकार्यक्षमता आणि मताच्या राजकारणापायी पाकिस्तानला बळ मिळत गेले.pakistan काँग्रेसच्या या धोरणामुळे आपल्या देशामधील लाखो निरपराध नागरिक पाकिस्तानी दहशतवादाला बळी पडले. परंतु, एखाद्या राष्ट्रभक्ताच्या हाती देशाची सत्ता गेल्यावर त्या राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राभिमान कसा जागृत होतो, याचे उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदीमध्ये बघावयास मिळते. अग्नी 5 या मिसाईलमुळे संपूर्ण पाकिस्तान भारताच्या टप्प्यामध्ये आला आहे. सात हजार किमीवर जाऊन अचूक मारा करणारे हे क्षेपणास्त्र पाकिस्तानचे कोणतेही शहर क्षणात उद्ध्वस्त करू शकते. नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलांचे आधुनिकीकरण करून शस्त्रसज्ज केले आहे. ऑपरेशन सिंदूर भारत सरकारने समाप्त न करतात ते थांबविले आहे. पाकिस्तानने भारताविरुद्ध फक्त एक कृती केली तर ऑपरेशन सिंदूरचा दुसरा भाग त्या देशाचे नामोनिशान मिटविण्याएवढे शक्तिशाली असेल. पाकिस्तानने ही वेळ भारतावर आणू नये, हीच इच्छा आहे.
9881717856