वर्धा,
drug free society अंमली पदार्थाच्या सेवनामुळे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होतात. सोबतच यातून गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून अंमली पदार्थ विरोधी अभियानात सहभाग नोंदवावा तसेच इतरांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले.
अग्निहोत्री कॉलेज परिसरातील शिवशंकर सभागृहात अंमली पदार्थ जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, मराठी नाट्य दिग्दर्शक हरीष इथापे, अतिरित पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, आर्वीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले, पुलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले आदी उपस्थित होते.
अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन शरीराची हानी करू नये. आपल्याला व समाजाला व्यसनापासून दूर राहण्यासाठी इतरांना यापासून परावृत्त करावे. अंमली पदार्थाचे सेवन, विक्री, वाहतूक करणारे, अंमली पदार्थ बाळगत असणार्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. अंमली पदार्थ विरोधी अभियान व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचे पुनर्वसन करून समाजात चांगला व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार देणारे अभियान आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील अलोने यांनी अंमल पदार्थापासून शरीरावर होणारे दुष्पपरिणाम व मानसिक आरोग्य परिणामाची माहिती दिली. गेले २६ वर्ष व्यवसनाच्या अधीन जाऊन आता व्यसनमुक्त झालेले अशोक कारेमोरे यांनी आपले अनुभव कथन करून व्यसनापासून आयुष्याचे कसे नुकसान होते याबाबत सांगितले. तसेच इंदिरा गांधी व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक सारीका देशपांडे यांनी सुद्धा व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सर्व मान्यवर व उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.