- खा. प्रफुल्ल पटेल यांचे वक्तव्य
गोंदिया,
सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी आम्ही सर्व मनापासून काम करणार आहोत, आम्हीच काय तर बारामतीची जनता स्वतः काम करणार आहे. अजित दादांनी जो बारामतीत विकास केला आहे. त्या विकासाला बघून तेथील जनता सुनेत्रा पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करणार असल्याचे वक्तव्य Praful Patel खा. प्रफुल पटेल यांनी मंगळवारी ७ एप्रिल रोजी केले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे सांगत काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा, यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
Praful Patel खा. पटेल हे गोंदिया - भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून मंगळवारी गोंदिया येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. प्रसंगी बारामतीच्या पोटनिवडणूकीविषयी बोलताना ते म्हणाले की, बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला असून तो अर्ज मागे घ्यावा, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. आम्ही बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता शेवटपर्यंत प्रयत्न करणार असून यात आम्हाला कसलाही लहानपणा वाटत नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या 'पाकिस्तानला घरात घुसून मारू' या वक्तव्याचे पटेल यांनी समर्थन केले. पाकिस्तान हा भारताचा 'जानी दुश्मन' असून दहशतवादामुळे अनेक निष्पापांचे बळी गेले आहे, तेव्हा हे केवळ एका राज्याचे नाही तर संपूर्ण भारताचे धोरण असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या 'डाऊनफॉल' बाबत केलेल्या विधानावर आणि त्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे व रोहित पवार यांनी केलेल्या टीके विषयी खा. पटेलांना विचारणा केली असता त्यांनी यावर भाष्य करणे टाळले.