वर्धा,
railway line funds पुलगाव-आर्वी नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतरण करून हा ब्रॉडगेज मार्ग वरुडपर्यंत वाढविण्याचे काम अखेर खा. अमर काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, पत्रव्यवहारामुळे हा महत्त्वाचा व जटील प्रश्न अखेर मार्गी लागला. रेल्वे मंत्रालयाने या रेल्वे मार्गाकरिता अर्थसंकल्पात २.४९ कोटींची तरतूद केली आहे.
पुलगाव-आर्वी रेल्वे नॅरोगेज मार्गावरून सन १९१७ मध्ये इंग्रजांच्या काळात ही रेल्वे सुरू झाली व ती सन २००५ पर्यंत सुरू होती. परंतु, अचानक ही रेल्वे बंद केल्याने आर्वी-आष्टी-कारंजा हा भाग रेल्वे सुविधेपासून वंचित झाला. आर्वी ही विदर्भातील महत्वाची कापसाची बाजारपेठ असल्याने रुई गाठी वाहतूक करणे तसेच मध्य रेल्वे लाईनला आर्वी शहराशी जोडणारी महत्त्वाची रेल्वे होती. खा. अमर काळे यांनी मार्च २०२५ च्या संसदीय सत्रात हा मुद्दा लोकसभेत उचलून धरला. सोबतच रेल्वे मंत्र्यांशी भेटीगाठी व पत्रव्यवहार सुरूच होता. पुन्हा त्यांनी मार्च २०२६ च्या अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला. यावेळी त्यांनी नागपूर मार्गाऐवजी हा मार्ग झाल्यास या मार्गावरून वर्धा ते आमला अंतर १०५ किमीने कमी होणार, एवढेच नव्हे तर सन १९७१ मध्ये युद्धाच्या काळात पुलगाव मिल्ट्री डेपो शत्रुच्या निशान्यावर असल्याने साहित्य तात्काळ आमला डेपोत हलविण्याच्या सुचना होत्या. लष्करी विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार पुलगाव-नागपूर-आमला हा मार्ग सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही व अंतरही १०५ किमीने जास्त असल्यामुळे पुलगाव-आर्वी-वरुड-आमला हाच मार्ग सुरक्षित मानल्या गेला व अंतरही १०५ किमीने कमी असल्यामुळे रेल्वे मार्ग सोडून पुलगाव-आर्वी-वरुड या रस्ता मार्गाने पुलगाव डेपोमधील साहित्य आमला येथे हलविण्यात आले होते.railway line funds ही बाब खा. काळे यांनी लोकसभेत सांगितला.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी या बाबीची गंभीर दखल घेत शेवटी पुलगाव-आर्वी हा मार्ग ब्रॉडगेज करून पुढे वरुड पर्यंत वाढविण्याबाबत तत्वत: मंजुरी दिली असून या ब्रॉडगेज मार्गाकरिता २.४९ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुलगाव-आर्वी ब्रॉडगेज मार्ग व पुढे हा वरुड पर्यंत वाढविण्याचे काम मार्गी लागणार आहे.
पुलगाव-आर्वी पर्यंत हा नॅरोगेज मार्ग ब्रॉडगेज करण्याकरिता स्टेशन व सर्वच इन्फ्रा तयार असून भूसंपादनाची गरज नाही. त्यामुळे पुलगाव-आर्वी-वरुड या मार्गावरील स्टेशन निश्चिती, वाहतूक सर्वेक्षण व रेल्वे लाईन अलाईनमेंट सर्वेक्षण झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून मिळाली आहे. हा प्रस्ताव मंजुरीकरिता सादर केला गेला असल्याचे रेल्वे विभागाकडे चौकशीअंती समजते. त्यामुळे उशिरा का होईना आर्वी-आष्टी-कारंजा-वरुड या भागातील लोकांना रेल्वे सुविधा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.