वर्धा,
rte-admission-process : कोणताही विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहू नये म्हणून २५ टके प्रवेश प्रक्रियेंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांत गरीब व गरजूंच्या पाल्यांना प्रवेश दिला जातो. सोमवार ६ एप्रिलला आरटीई प्रवेश प्रक्रियेचा महत्वाचा टप्पा म्हणजे सोडत (लकी ड्रॉ) ही प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात आली. पण ७ रोजी दुपारी ४.३० वाजतेपर्यंत सोडत मध्ये कुठल्या पाल्याचे भाग्य बलवंत राहिले याची माहिती आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे आपल्या पाल्याची निवड आरटीई अंतर्गत झाली की नाही हे पालकांना सहज कळू शकले नाही. सोडत प्रक्रिया झाली आता १० एप्रिलपासून पालकांना मॅसेज पाठविले जाईल, असे शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविताना सुरूवातीला १ किमीची अंतर मर्यादा निश्चित करण्यात आली होती. या प्रक्रियेला न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानंतर अंतर मर्यादेत बदल करण्यात आला. आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी यंदा जिल्ह्यातील ११३ शाळांनी नोंदणी केली. या ११३ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत १ हजार ३९० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून तब्बल ३ हजार ९८४ अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले आहे. वेळोवेळी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळाल्याने मोठ्या संख्येने ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज स्विकारण्याची मुदत संपल्यावर सोडत केव्हा काढली जाईल याकडे पालकांचे लक्ष लागून होते. सोमवार ६ रोजी ही सोडत काढण्यात आल्याचे शिक्षण विभागातील अधिकार्यांकडून सांगण्यात येत असले तरी आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर सोडतमध्ये कुणाचा नंबर लागला याची इत्यंभूत माहितीच जाहीर करण्यात आली नसल्याने पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. ६ एप्रिलला पुणे येथील शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी एक पत्र निर्गमित करून आरटीई २५ टके प्रवेश प्रक्रियेची निवड यादी १० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केल्यानंतर बालकांच्या पालकांना निवड झालेल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी १० ते २० एप्रिल २०२६ पर्यंत लिंक उपलब्ध करून देण्याच्या सूचना पुणे येथील वरिष्ठ तांत्रिक संचालक आदिती एकबोटे यांना सूचना दिल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले.