सिंदी (रेल्वे),
accident : येथील नगरपालिकेचे उपाध्यक्ष अकीलभाई शेख यांच्या वाहनाचा जिल्ह्याच्या सीमेलगत नागपूर जिल्ह्यातील सोनेगावजवळ नागपूर-चंद्रपूर महामार्गावर सोमवार ६ रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा अक्षरशः चेंदामेदा झाला. यात अकीलभाई शेख आणि त्यांचा मित्र मुकेश डोळसकर रा. सिंदी रेल्वे दोघेही गंभीर जखमी झाले. सदर वाहनात नप उपाध्यक्ष अकीलभाई शेख आणि त्यांचा मित्र मुकेश डोळसकर हे दोघेच प्रवास करीत होते.
घटनेची माहिती सिंदी येथे पोहचताच शहरातील युवक मित्रांनी घटनास्थळी पोहचून जखमींना सिंदी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील न्यूरॉन रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे कळते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून अपघाताचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनास्थळ नागपूर जिल्ह्यातील बेला पोलिस स्टेशन अंतर्गत येत असल्याने पुढील तपास बेला पोलिस करीत आहेत.