मानोरा,
Statement by A. Babusingh Maharaj देशाच्या प्रगतीमध्ये शेकडो वर्षापासून हातभार लावणारा स्वाभिमानी बंजारा समाज असून, समाजातील युवा वर्गाने व्यापार उद्योगाच्या माध्यमातून समाजाचे नाव भारतच नव्हे तर जगभरात पुढे आणण्याचे आवाहन आमदार बाबुसिंग महाराज यांनी केले. आमदार बाबूसिंग महाराज (राठोड) यांच्या हस्ते गुजरात मधील सुरत या व्यापारी शहरात बंजारा समाजाचा विकासाला आणि संघटनेसाठी कार्यरत तरुणांना बंजारा रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असता ते बोलत होते. तुळजाभवानी शिवसाई बंजारा प्रतिष्ठान बेस्तान च्या वतीने सुरत येथे आयोजित कार्यक्रमाला गोर गादिश्वर आ.बाबूसिंग महाराज (राठोड) यांच्या समवेत मध्य प्रदेश चे राज्यमंत्री बाबूलाल सुरावत,कर्नाटकचे माजी खा. उमेश जाधव, गोरसेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण आदीसह आध्यात्मिक,राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

ब्रिटिशपूर्व कालखंडात संपूर्ण भारतासह आशिया खंडामध्ये धान्याचा पुरवठा करणारा बंजारा हा व्यापारी समुदाय इंग्रजांच्या आमदानीत देशभर विखुरला गेलेला आहे.एकच संस्कृती, रितीभाती, प्रथा परंपरा, बोलीभाषा आणि पेहराव असणारा समाज आपल्या वैभवशाली संस्कृती आणि बोलीमुळे एकाच सूत्रात देशभरात बांधल्या गेलेला असल्याचे प्रतिपादन आमदार बाबुसिंग महाराज यांनी यावेळी केले. वाशीमसह महाराष्ट्रातून सुरत मध्ये रोजगारा निमित्य गेलेल्या दिलावर राठोड, अजय जाधव, सागर चव्हाण, रोशन राठोड, पिंटू राठोड, बिरजू बंजारा,अजय राठोड आणि विपुल राठोड या युवकांना आ. महाराजांच्या हस्ते बंजारा रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बंजारा महासंमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जिग्नेश भाई पाटील यांनी आयोजकांना सर्व प्रकारची मदत केल्याची माहिती मानोरा तालुयातील अजय किशोर जाधव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.