तेरा अक्षरी श्रीराम मंत्राचे रहस्य!

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
shri ram mantra ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा तेरा अक्षरी श्रीराम मंत्र आहे. या मंत्राचा जप सर्वत्र होत असतो. हा तारक मंत्र असून या मंत्राच्या प्रभावाने भवसागर सहज पार करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी येते, हा आपला दृढ विश्वास आहे. श्रीराम मंत्र साक्षात भगवान सदाशिव महादेव सदैव स्मरतात. हरिपाठात ‘आत्मा जो शिवाचा रामजप’ हे स्पष्ट सांगितले आहे. याशिवाय ‘पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीकि, नामे तिन्ही लोकं उद्धरती’ हे माउलींनी सांगून रामनामाचा महिमा विशद केला आहे.
 
 

shri ram 
 
 
श्रीराम हा मंत्र म्हणजे अग्निबीज आहे. त्याच्या आर्त उच्चाराने शरीर तप्त होते. याची प्रचीती एकदा घेऊन पाहिली पाहिजे. एका अर्थाने रामनामाने नैसर्गिक तप होतो. हा तेरा अक्षरी मंत्र मराठीत आहे आणि तो अलिकडच्या कोणी सिद्ध पुरुषाने आपल्या सर्वांना दिला, असा अनेकांचा गैरसमज आहे. या तेरा अक्षरी मंत्राचे रहस्योद्घाटन आज आपण करण्याचा प्रयत्न करू.
विविध उपनिषदांमध्ये ‘श्रीरामरहस्योपनिषद’ नावाचे उपनिषद आहे. या उपनिषदात कथा आलेली आहे. एकदा मुद्गल ऋषी, शांडिल्य ऋषी, पिंगल ऋषी, सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार एकत्रित चर्चा करीत असताना तारक ब्रह्म कोण आणि तारक मंत्र कोणता यावर संवाद सुरू झाला. त्याचे खरे उत्तर कोणाकडून मिळेल, अशी मंत्रणा सुरू झाली. या प्रश्नाचे उत्तर ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ असलेले भगवान हनुमंतराय देतील म्हणून ही सर्व मंडळी मारुतीरायाकडे आली. तेव्हा मारुतीरायांनी त्यांना त्वरित सांगितले की, तारक ब्रह्म म्हणजे भगवान श्रीराम.
‘एतेषु चैव सर्वेषु तत्त्वं च ब्रह्म तारकम् ।
राम एव परं ब्रह्म तत्त्वं श्रीरामो ब्रह्म तारकम् ।।’
या ऋषींनी हनुमंतरायांना तारक मंत्राबाबत विचारले तेव्हा मारुतीरायांनी त्यांना विविध असे श्रीराम मंत्र सांगितले. त्यात त्यांनी एकाक्षर राममंत्र, दोन अक्षरी, तीन अक्षरी असे एकूण जवळ जवळ सत्तेचाळीस अक्षरी म्हणजे एकूण सत्तेचाळीस श्रीराम मंत्र सांगितले. सर्वसामान्यांसाठी तारक मंत्र म्हणून तेरा अक्षरी ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा मंत्र त्यांनी सांगितला. श्रीराम रहस्य उपनिषदात या मंत्राचा श्लोक आहे.
‘श्रीरामेति पदं चोक्त्वा, जय राम ततः परम् ।
जय द्वयं वदेत् प्राज्ञो, रामेति मन्त्रराजकः ।।’
भगवान हनुमंतरायांनी हा मंत्र संस्कृत श्लोकातून विशद केला. पहिल्यांदा श्रीरामेती पदं म्हणजे श्रीराम जय राम तत: म्हणजे त्यानंतर जयराम येईल. पुढे जय द्वयं म्हणजे जय जय म्हणावे. त्यानंतर रामेती म्हणजे शेवटी राम असे सांगितले. म्हणजे ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा तेरा अक्षरी मंत्र तयार होतो. यावरून लक्षात येईल की, तेरा अक्षरी मंत्र प्रत्यक्ष हनुमंतरायांनी सनतकुमारादी ऋषिमुनींना सांगितला. हा मंत्र श्रीरामरहस्योपनिषदात आहे.
या उपनिषदातच हनुमंतरायांनी विविध अक्षरी मंत्रांचे विधान सनकादी ऋषींना सांगितले. त्यात तेरा अक्षरी हा सर्वाभिष्ट मंत्र असून या मंत्र जपात मंत्र, तंत्र आणि यंत्र यांचेही विश्लेषण आहे. या मंत्राचे पुरश्चरण विधानही उद्धृत केले आहे. मारुतीराय स्पष्ट करतात की, ‘र’ हे अक्षर निरंजन ब्रह्म आहे तर ‘आ’ हे मायातत्त्व तर त्यापासून बनलेले ‘रा’ हे प्राणतत्त्व तर ‘म’ हे उन्नती दर्शक आहे. राम हे निरंजन ब्रह्म जीवाची उन्नती म्हणजे मानवाचा माधव करणारे सिद्ध तत्त्व आहे. वेदाचे महावाक्य ‘तत्त्वमसि’ यातील ‘रा’ हे तत्पद, ‘म’ हे त्वं पद तर ‘राम’ हे असीपद असल्याचेही हनुमंतराय स्पष्ट करतात. असा हा सिद्ध आणि तारक मंत्र असून याचे प्रकट कर्ते ऋषी मारुतीराय आहे.
पुढे हा मंत्र श्रीरामसंप्रदायात प्रचलित झाला.shri ram mantra श्रीरामानुजाचार्य परंपरा, रामानंदी परंपरा, समर्थ रामदासी परंपरा, सद्गुरू गोंदवलेकर, सद्गुरू प्रल्हाद महाराज यांनी या मंत्राला विशेष महत्त्व प्राप्त करून दिले. उपासनेत या मंत्राची प्रचीती सर्वांना येत गेली आणि हा मंत्र सिद्ध, अतिसिद्ध, परमसिद्ध झाला. हा मंत्र प्रचंड प्रभावी आहे. तेरा अक्षरी मंत्र जपाने-
1) कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी
2) पळे भूतबाधा येणे तेथे
3) म्हणती जे वाचा तया मोक्ष
4) पापाचे कळप पळती पुढे
5) अनंत पाप राशी, जातील लयाशी
6) पापे अनंत कोटी गेली त्याची
7) जळतील पापे जन्मांतरीची
8) पवित्रची होय देह त्याचा
-अशी संतांची अनेक प्रमाणे आहेत; ज्यातून रामनाम माहात्म्य स्पष्ट होते. म्हणून श्रीराम नाम जप रोज केला पाहिजे. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा जीवनाचे कल्याण करणारा, भवसागर पार करून ऐहिक आणि पारलौकिक सुखाचा मार्ग सोपान आहे.
प्रा. दिलीप जोशी
9822262735
---