वर्धा,
trap-cameras-for-wildlife-counting : सेलू तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना भूरळ घालणारा असून या प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रासह प्रादेशिक वन विभागाच्या कार्यक्षेत्रात येणार्या जंगलात पट्टेदार वाघांचा अधिवास आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात ४२५ ट्रॅप कॅमेरे लावून फेज-४ राबविण्यात आला. तर आता प्रादेशिक वन विभागाच्या कार्यक्षेत्रात येणार्या ६३ हजार हेटर क्षेत्रात तब्बल ४४० ट्रॅप कॅमेरे लावून फेज-४ राबविला जाणार आहे. याच गणनेअंती मांस भक्षी वन्यजीवांसाठी मुबलक प्रमाणात तृणभक्षी वन्यजीव आहेत काय, याबाबतची माहितीही प्रादेशिक वन विभागाला कळणार आहे.
वन्यप्राणी गणनेसाठी जिल्ह्यातील प्रादेशिक वन विभागाच्या क्षेत्रात एकूण २२० ग्रीड निश्चित करण्यात आले आहे. एका ग्रीड मध्ये दोन याप्रमाणे २२० ग्रीडमध्ये एकूण ४४० ट्रॅप कॅमेरे लावून ते एक महिना कार्यरत ठेवले जाणार आहे. याच ट्रॅप कॅमेर्यांमध्ये वाघ, बिबट, अस्वल आदी वन्यप्राणी कैद होणार आहेत. शिवाय ट्रॅप कॅमेरे काढल्यावर त्यातील डाटा पडताळणीसाठी देहरादून येथील तज्ज्ञांना पाठविण्यात येणार आहे. चालू आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्यात २२० ग्रीड मध्ये ट्रॅप कॅमेरे लावण्याचे काम सुरू केले जाणार आहे.
वन्यजीवांची गणना करताना ट्रान्झिट लाईन व कॅमेरा ट्रॅपींग पद्धतीचा अवलंब केला जात आहे. २ बाय २ चौरस किमीचा १ ग्रीड असे एकूण २२० ग्रीड प्रादेशिक वन विभागाच्या कार्यक्षेत्रात एनटीसीएच्या अधिकार्यांनी निश्चित करून दिले आहे. याच ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे. ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेर्यांपैकी कुठल्या कॅमेर्याचे वन्यजीवाने नुकसान तर केले नाही ना किंवा ते तांत्रिक दोष निर्माण होत बंद तर पडला नाही ना, याची शहानिशा नियमित गस्तीच्या माध्यमातून वनरक्षक करणार आहे.
बोर प्रशासनाला मागीतले १०० ट्रॅप कॅमेरे
प्रादेशिक वन विभागाच्या कार्यक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी २२० ग्रीड निश्चित करण्यात आले आहे. एका ग्रीडमध्ये २ या प्रमाणे ४४० ट्रॅप कॅमेरे ठिकठिकाणी लावण्यात येणार आहे. प्रादेशिक वनविभागाकडे पुरेसे ट्रॅप कॅमेरे नसल्याने बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाला १०० ट्रॅप कॅमेरे मागण्यात आले आहे. बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनानेही १०० ट्रॅप कॅमेरे देण्यास होकार दिला असल्याचे सांगण्यात आले.