नवी दिल्ली,
Vikram Misri on tour of America भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे ८ ते १० एप्रिल दरम्यान वॉशिंग्टन डी.सी. येथे तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीत भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचा सर्वांगीण आढावा घेण्यावर भर राहणार आहे.या दौऱ्यात व्यापार, संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान यांसह विविध महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्याचा आढावा घेतला जाणार असून, पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही वरिष्ठ पातळीवर संवाद होणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यास आणि सुरू असलेल्या सहकार्याला गती देण्यास मदत होईल. याआधी फेब्रुवारी महिन्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही अमेरिकेचा दौरा केला होता. त्यानंतरचा हा पुढील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.या भेटीत प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावरही चर्चा पुढे नेली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही काळात उद्भवलेल्या तणावानंतर दोन्ही देश संबंधांमध्ये स्थिरता आणण्याचा प्रयत्न करत असताना हा दौरा महत्त्वाचा ठरत आहे.