विचारांमध्ये परिवर्तन केल्यास दारूमुक्ती शक्य

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
व्यसनमुक्ती तज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांची जनजागृती
‘वर्ल्ड अल्कोहोल स्क्रीनिंग डे’

यवतमाळ, 
दारूच्या व्यसनाबद्दल आपल्या समाजात जनजागृती नाही. याउलट लोकांच्या मनात बऱ्याच गैरसमजुती असल्याने दारूमुक्तीकडे आपल्या समाजाची वाटचाल संथ गतीने सुरू आहे. परंतु, विचारांमध्ये परिवर्तन केल्यास दारूमुक्ती सहज शक्य आहे, असे विचार मानसोपचार तथा व्यसनमुक्ती तज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी मांडले. ‘वर्ल्ड अल्कोहोल स्क्रीनिंग डे’च्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले अनुभवकथन केले. जगभरात 6 एप्रिलपासून ‘World Alcohol Screening Day’ दारूमुक्ती सप्ताह पाळला जातो. आपल्या समाजात दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. व्यसनाधीन व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वच घटकांवर गंभीर परिणाम होतात.
 
 
Alcohol
 
डॉ. मेश्राम म्हणाले, दारूचे व्यसन हे केवळ त्या व्यक्तीपुरते मर्यादित राहात नाही, तर त्याचा परिणाम कुटुंब, नातेसंबंध, करिअर, सामाजिक प्रतिष्ठा, रोजगार आणि शारीरिक व मानसिक आरोग्यावरही होतो. मानसशास्त्रीयदृष्ट्या वयाच्या पंचविशीपर्यंत कोणतेही व्यसन जडण्याचा धोका अधिक असतो. दारूमुळे ताकद वाढते, थंडी कमी होते किंवा ती हृदयासाठी चांगली असते अशाही थापा काहीजण मारतात. काही लोकांकडून तर दारूमध्ये करणी केली, असेही ऐकायला मिळते. अचानक दारू सोडल्याने जीव जाऊ शकतो किंवा यावरील औषधांनी शरीरावर साइड इफेक्ट होतात, अशीही काहींची समजूत आहे, असेही ते म्हणाले.
 
 
या तथ्यहीन समजुतीमुळेच बरेचजण उपचाराकडे वळत नाहीत. पण वास्तविक पाहता नियमित उपचार, समुपदेशन आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळाला तर या व्यसनावर मात करता येते, असाही विश्वास डॉ. मेश्राम यांनी व्यक्त केला. व्यसनाधीन वराला लग्नासाठी उपवर वधू मिळत नाही तर लग्नानंतर दारूची लत लागणे ही समस्या बाब समजली जाते. त्यांच्या संसाराची गाडी रुळावर येण्यापूर्वीच त्यांच्यात संशयी वृत्ती बळावते. पैशांची बचत होण्याऐवजी दारूवर अनाठायी खर्च होतो, त्याचे कामजीवन प्रभावित होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुलाबाळांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच समाजात दारुड्या म्हणून हिणवले जाते. मित्र दूर जातात आणि नातेवाईकांमध्ये अपप्रचार व्हायला लागतो. या साèयांचा व्यसनी व्यक्तीच्या मानसिकतेवर थेट परिणाम होऊन त्यांच्यात आयुष्याविषयी नकारात्मक वृत्ती वाढते. त्यांना आपले आयुष्य अर्थहीन वाटू लागते, यातून आलेली खिन्नता त्यांच्या आयुष्याला बेरंग करून सोडते. परंतु, या व्यसनावर खात्रीलायक मात करता येते, त्यामुळे वैज्ञानिक मार्गाने दारूमुक्तीकडे वाटचाल केली पाहिजे, असे ते म्हणाले.

दारू प्यायल्याने मेंदूत काय घडते..?
‘World Alcohol Screening Day’ दारू घेतल्यावर मेंदूमधील ‘डोपामिन’ नावाचे रसायन वाढते. त्यामुळे व्यक्तीला थोडासा आनंद मिळतो. याच आनंदासाठी तो परत दारूकडे वळतो. शेवटी दारूशिवाय आता काहीच जमत नाही, या स्थितीवर ही माणसे येतात. याला ‘अल्कोहोल इंड्युस सिंड्रोम’ म्हणतात. हात थरथरणे, झोप न येणे, कामात मन न लागणे ही त्याची काही प्रमुख लक्षणे आहेत. अचानक दारू बंद केल्याने काही लोकांना भ्रमाचे झटके सुरू होतात, वेगवेगळे आवाज ऐकू येतात. त्यांच्या बोलण्यात एकवाक्यता नसते. कधीकधी ते आपल्या कुटुंबियांनासुद्धा ओळखत नाहीत. त्यांचे वेगाने हृदय धडधडणे, हातांमध्ये थरकाप, निद्रानाश, मळमळ आणि जेवणाविषयी अनिच्छा वाढते, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने दारू बंद करण्याचा निश्चय केला किंवा अचानक दारू बंद करून डॉक्टरांना दाखविले तरीही पुढील उपचार होऊ शकतात. यामुळे जीवितास धोका नसतो, अशी माहिती डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी दिली.