बुलढाणा,
prataprao-jadhav : योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही. योग ही एक समग्र जीवनशैली आहे जी शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण करते. योग आपल्याला मानसिक शांती, शारीरिक सुदृढता आणि सकारात्मक जीवनदृष्टी देतो. आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत योगाचे महत्त्व अधिकच वाढले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाला ७५ दिवस शिल्लक असताना योगाचा प्रचार प्रसार व्हावा, या दृष्टिकोनातून केंद्रीय आयुष्य बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावर करण्यात आले होते. या योग महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज सकाळी झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आयुष विभागाच्या सहसचिव मोनालिसा दास, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह माजी आमदार संजय रायमुलकर, राजश्री प्रतापराव जाधव, आयुक्त रमेश चौहाण, मोरारजी देसाई संस्थाचे डॉ. काशिनाथ, नगराध्यक्ष, लोणार मीराताई भूषण मापारी, प्रकाश जी मापारी, बळीरामजी मापारी, आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी संघटनाचे अनंत बिरादार, उपस्थित होते.
प्रतापराव जाधाव म्हणाले की, आज जगासमोर असलेल्या गैर-संचारी रोगांच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी योग अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो. नियमित योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि तणाव यांसारख्या अनेक समस्यांवर नियंत्रण मिळवता येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आज लोणारच्या ऐतिहासिक भूमीवर एक नवा कीर्तिमान प्रस्थापित झाला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२६ १०० दिवसीय काउंटडाउनच्या ७५ व्या दिवशी आयोजित योग महोत्सवात ६ हजार योगसाधकांनी एकाच वेळी त्रिकोणासन चा अभ्यास केला. या गौरवशाली कामगिरीची अधिकृतपणे नोंद करण्यात आली आहे. हा विक्रम केवळ आपल्या योगशक्तीचे प्रतीक नाही, तर पंतप्रधान यांच्या ’स्वस्थ भारत, विकसित भारत’ हा संकल्प सिद्ध करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचं मत केद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले. योग अभ्यासामधील त्रिकोणासनामध्ये एकाच वेळी सहा हजार लोकांनी योगासन केल्याप्रकरणी एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांना देण्यात आले.