मुंबई,
10% increase in bus fares राज्य परिवहन महामंडळाने उन्हाळी सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन एसटी बस भाड्यात १० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन भाडेवाढ १५ एप्रिलपासून लागू होईल. याशिवाय प्रत्येक तिकिटावर दोन रुपये स्वच्छता अधिभारही लागू राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्टीत ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. राज्य परिवहन महामंडळाचे जाळे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांपर्यंत पसरलेले असल्याने हजारो प्रवासी खासगी वाहनाऐवजी एसटी बसला पसंती देतात. गर्दीच्या दिवसांत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार महामंडळाला आहे. सन २०२६च्या उन्हाळी हंगामासाठी १० टक्के भाडेवाढ लागू केली जाईल.
स्वच्छता अधिभाराची अट
एसटी गाड्यांच्या स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने स्थानके आणि गाड्यांची स्वच्छता कंत्राटदाराच्या मदतीने केली जाईल. प्रत्येक तिकिटावर दोन रुपये स्वच्छता अधिभार घेतला जाईल. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलतधारी प्रवाशांना यावर सूट मिळेल.
पास आणि भाडे
आवडेल तेथे प्रवास योजनेंतर्गत चार आणि सात दिवसांचा पास देण्यात येतो. अशा पाससाठी पाच रुपये स्वच्छता अधिभार लागेल. आगाऊ आरक्षणातून काढलेल्या पासवर स्वच्छता अधिभार लागू होणार नाही. भाडेतत्त्वाने बस भाडे घेणाऱ्यांना प्रति बस ५० रुपये अधिभार द्यावा लागेल.
ई-बस गाड्यांना सूट
लालपरी, मिडी, जलद सेवा आणि रात्रसेवा देणाऱ्या गाड्या वगळता साध्या बसेसवर ही भाडेवाढ लागू असेल. प्रौढ प्रवाशांसाठी प्रति टप्पा भाडे १२ रुपये आणि लहान मुलांसाठी ७ रुपये निश्चित करण्यात आले आहे. हिरकणी, शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी आणि शिवनेरी यांसारख्या गाड्या व ई-बस दरवाढीपासून वगळण्यात आल्या आहेत.