पुणे,
bhimashankar-temple-closed : नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात विकासकामे सुरू असल्याने मंदिर भाविकांसाठी ३१ मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामागे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी भाविकांची गर्दी, भाविकांची सुरक्षितता आणि जून महिन्यात पावसाचे प्रमाण यांचा विचार करण्यात आला आहे.
मंदिरात सुरू असलेली कामे सुरळीत पार पडण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने दर्शन बंद ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. सुरुवातीला ९ जानेवारी ते ९ एप्रिलपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय होता, परंतु कामे अजून पूर्ण झालेली नसल्यामुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे.
सभामंडपाचे सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, घुमटाचे काम आणि पायरीमार्गाची सुधारणा प्रगतीपथावर आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता असल्यामुळे कामे जलदगतीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
डुडी यांनी भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांच्यासोबत यशस्वी कामांसाठी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.