चंद्रपूर,
Collector Vasumana Pant notice खते आणि बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने ‘अलर्ट मोड’वर काम करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.शेतकर्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम हा अतिशय महत्वाचा असतो. यावर्षीच्या हंगामाकरिता चंद्रपूर जिल्ह्यासाठी रासायनिक खते आणि बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. आजघडीला जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकर्याला प्राधान्याने खते आणि बियाणे उपलब्ध करून द्यावे. मात्र, परराज्यातील शेतकर्यांना त्याची विक्री करू नये, असेही पंत यांनी बजावले आहे.
जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या बैठकीत खते आणि बियाणांची जिल्हाकरीता मागणी, आवंटन आणि उपलब्धता याबाबत आढावा घेतांना त्या बोलत होत्या. बैठकीला कृषी विभागाचे उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपुत, आत्माचे संचालक अरुण कुसळकर आदी उपस्थित होते. सिमेलगतच्या भागात कृषी आणि पोलिस विभागाने सजग राहून काम करावे. बाहेर राज्यात त्याची विक्री होऊ देऊ नका. बियाणे उगवत नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्या तर कृषी विभागाने त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.
खते आणि बियाणांची उपलब्धता आणि मागणी
चंद्रपूर जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2026 करीता एकूण खतांची मागणी 1 लक्ष 99 हजार 900 मे. टनची असून, मंजूर आवंटन 1 लक्ष 80 हजार 800 मे. टन आहे. यापैकी आजघडीला जिल्ह्यात 93335 मे. टन खतांची उपलब्धता आहे. यात युरीया 23409 मे. टन, डीएपी 7502 मे. टन, एमओपी 825 मे. टन, संयुक्त खते 35224 मे. टन आणि एसएसपी 26375 मे. टन आहे. मंजूर आवंटन टप्प्याटप्याने जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर, जिल्ह्यासाठी एकूण 61619 क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली असून, यात भात पिकाचे बियाणे 41796 क्विंटल, ज्वारी 270 क्विंटल, तूर 1874 क्विंटल, मूग 12 क्विंटल, उडीद 13 क्विंटल, सोयाबीन 13125 क्विंटल, तीळ 10 क्विंटल, कापूस (बी.टी.) 4519 क्विंटल, कापूस बी.टी. (पॅकेट) 9 लक्ष 51 हजार 368 मागणी करण्यात आली आहे.