पवनी,
Commendable initiative of the city council कुठल्याही परीक्षेला समोर जाण्यापूर्वी, त्याचा सराव झाला असल्यास यशाची खात्री अधिक पटीने वाढते. म्हणूनच नगर परिषद पवनीच्या वतीने पुढाकार घेत गुरुकुल सीपीएस क्लासेस संयुक्त विद्यमानाने उपक्रम राबविला गेला. शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या चवथ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आली. तालुकास्तऱीय या स्पर्धेत 32 शाळांमधील 237 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित उपक्रम सार्थ ठरविला. नगराध्यक्षांकडून यावेळी पाच प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. पवनी शहरातील शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पहिल्यांदाच वर्ग चौथीचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला पुढे जाणार आहेत.
अशावेळी परीक्षेसंदर्भात त्यांच्या मनात असलेली भीती, शंका दूर व्हाव्यात आणि सरावाच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या या सराव परीक्षेत 237 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पवनी शहरातील 16 व ग्रामीण भागातील 16 शाळा यात सहभागी होत्या. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक, सर्व शाळा शिक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. नगरपरिषद शाळेच्या इमारतीत झालेल्या सराव परीक्षेत चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. नगराध्यक्षा डॉ. विजया नंदुरकर यांच्याकडून हे बक्षीस देण्यात आले. यावेळी नगरसेविका भाग्यश्री गोमासे, सुरेश अवसरे, सोनू दंडारे, पीएम श्री नगर परिषद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बिलवणे सर, गुरुकुल सीपीएस क्लासेसचे प्रमुख रवी भिसीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सरावातून विश्वास येतो : डॉ. नंदुरकर
परीक्षेला समोरे जाताना आपली तयारी आपल्याला आत्मविश्वास देते. सरावातून निर्माण होणारा विश्वास प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी आपल्याला धीर देणारा ठरतो. न घाबरता परीक्षेला समोरे जा. भविष्यात कुठल्याही क्षेत्रात स्वतःचे आयुष्य घडवायचे असेल तर स्पर्धा परीक्षा हाच मार्ग असून त्यासाठी अशाच प्रकारची तयारी महत्वाची असते. त्यामुळे सरावातून स्वतःला तयार करा, असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा डॉ. विजया नंदुरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.