नाशिकमध्ये धर्मांतराचं ‘कंपनी कांड’ उघड!

बळजबरीने नमाज-बीफ खाण्याचा दबाव

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
नाशिक,
conversion-case : मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या काही तरुणींना नोकरीच्या गरजेचा फायदा घेत मानसिक, शारीरिक आणि धार्मिक दबावाचा सामना करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनही सतर्क झाले आहे.
 
 

NASHIK 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून १८ ते २५ वयोगटातील गरजू महिलांना लक्ष्य करून त्यांच्यावर विविध प्रकारचा दबाव टाकला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नोकरीची गरज असल्यामुळे या तरुणींना काही गोष्टी करण्यास भाग पाडले जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यामध्ये धार्मिक कृती करण्यास सक्ती, आहाराबाबत दबाव आणि मानसिक छळ अशा गंभीर बाबींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
 
या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. विविध पोलीस ठाण्यांत विनयभंग, अत्याचार आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. एका महिला आरोपीचा शोध सुरू असून अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली हे पथक सखोल तपास करत आहे. तपासादरम्यान आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
दरम्यान, प्रशासनाने शहरातील सर्व खासगी कंपन्यांना अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा सक्रिय ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले असून, त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.