नवी मुंबईत विभागीय अध्यक्षाला लाच घेताना अटक

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
नवी मुंबई,
Divisional president arrested in Navi Mumbai नवी मुंबईतील वाशी येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरेंना २२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी सांगितले की, तक्रारदाराला १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी वाशी येथील मंडळाच्या कार्यालयातील विद्युत देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले होते. नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीसाठी सुमारे ३.१६ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी अहिरेंनी ७ टक्के कमिशन म्हणून २२,१७६ रुपयांची लाच मागितली, अशी माहिती उपअधीक्षकांनी दिली. ही लाच मागणी भांडार विभाग प्रमुख मनोहर पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.
 
 
arrested 
 
२५ मार्च रोजी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर ६ एप्रिल रोजी पडताळणी केली असता लाच मागणीची खात्री पटली. त्यानंतर ७ एप्रिल रोजी सापळा रचून अहिरेंना त्यांच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना पकडण्यात आले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दरम्यान, राजेंद्र अहिरेंवर याआधी फेब्रुवारीत एका वेगळ्या प्रकरणात तक्रार दाखल झाली होती. निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनीसह १९ जणांविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि विश्वासघाताचे आरोप केले होते. अलीबाग आणि खोपोली येथील दोन शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करण्यात आले असल्याचेही आहिरे यांनी याआधी सांगितले होते.