अंतिम प्रवासातही मानवतेचा दीप

स्व. पुंजाजी यादव आसोले यांचे नेत्रदान

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
वाशीम,
Eye donation by Punjaji Yadav Asole वाशीम तालुक्यातील वाई येथील स्व. पुंजाजी यादव आसोले (वय ८१) यांचे आज, ८ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार असून, आसोले कुटुंबातील आधारस्तंभ, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि समाजकार्याची विशेष आवड असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण आसोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही कुटुंबियांनी अत्यंत संवेदनशील आणि प्रेरणादायी निर्णय घेत मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. देशमुख यांच्याकडे ही इच्छा नोंदविल्यानंतर तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने कार्यवाही केली.
 
 
asole
 
 
जिल्हा शल्य चिकित्सक अनिल कावरखे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक अविनाश पुरी, नेत्र शल्यचिकित्सक आशिष बेदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी महाले मॅडम, ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे यांनी स्व. आसोले यांचे नेत्र सुरक्षितरीत्या काढून ते त्याच दिवशी वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे पाठविण्यात आले. या कार्यासाठी डॉ. आळणे, जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी तसेच आसोले कुटुंबियांचे सहकार्य लाभले. दरम्यान, सर्व समाजातील नागरिकांनी नेत्रदान चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, मृत्यूनंतर त्वरीत नेत्रदान घडवून आणावे आणि नेत्रदानानंतरच अंत्यसंस्कार करावेत, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक अनिल कावरखे यांनी केले आहे. तसेच या प्रेरणादायी कार्याबद्दल त्यांनी आसोले कुटुंबाचे आभार मानले.