मानोरा,
farmer family hunger strike तालुक्यातील मौजे गव्हा शिवारातील गट क्र. १९ व २० या शेतजमीनीच्या वादाने आता तीव्र स्वरूप धारण केले असून, गव्हा येथील शेतकरी दुर्गाबाई हेडा, संदीप हेडा, योगिता हेडा व वसंतकुमार हेडा यांनी तहसीलदार यांच्यावर थेट संगनमत, भ्रष्टाचार व शेतकर्यांचे जाणीवपूर्वक नुकसान केल्याप्रकरणी तहसील कचेरीवर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनानुसार गट क्र. १९ व २० मधील नाल्यालगत पूर्वीपासून अस्तित्वात असलेला रस्ता जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आला असून, गैरअर्जदार दयाराम राठोड याने प्रशासनाशी संगनमत करून रुंदीकरण या नावाखाली नवीन रस्ता लादण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात तहसीलदारांनी आपल्या पदाचा गैरवापर करत एकतर्फी व मनमानी आदेश दिल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. शेतकर्यांच्या मते, या निर्णयामुळे त्यांच्या शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतीयोग्य क्षेत्र कमी झाले आहे. तसेच प्रशासनाने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून खोट्या कारणांवर आधारित निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नाल्यालगत असलेला मूळ रस्ता जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आला, खोट्या कारणावरून नवीन रस्ता जबरदस्ती लादण्यात आला, तहसीलदारांनी पदाचा गैरवापर करून एकतर्फी आदेश दिला, प्रशासनाचा गैरवापर करून शेतकर्यांना मानसिक व आर्थिक त्रास देण्यात आला,असा आरोप तक्रारकर्त्यांनी निवेदनातून केला आहे.
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या हेडा कुटुंबीयांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदन सादर करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.farmer family hunger strike यात तहसीलदारांच्या आदेशाला स्थगिती देणे, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणे, संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करणे आणि मूळ रस्ता पूर्ववत करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. हेडा कुटुंबीयांनी न्यायासाठी तहसील कचेरीवर आमरण उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.