कोल्हापूर,
Ghatge joins BJP पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. कोल्हापूरमधील प्रभावी नेते समरजित घाटगे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये पुनर्प्रवेश करत ‘घरवापसी’ केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी पुन्हा भाजपची वाट धरत राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात केली आहे.
मुंबईतील पक्ष मुख्यालयात झालेल्या प्रवेशावेळी घाटगे यांनी आपण आपल्या मूळ पक्षात परतल्याची भावना व्यक्त केली. या निर्णयामुळे कोणालाही अडचण निर्माण होणार नाही, असे सांगताना त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे मतभेदही आता मिटल्याचे स्पष्ट केले. स्थानिक निवडणुकांमध्ये दोघांमध्ये चांगला समन्वय दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून मतभेद दूर केल्यामुळे पुढे एकत्र काम करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी सांगितले.
घाटगे यांनी आपला पक्षप्रवेश काही काळापासून प्रलंबित असल्याचेही स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या चिन्हावर विजय मिळवला होता. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली आणि अखेर अधिकृत निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना घाटगे यांनी त्यांना मोठ्या भावासारखे मानत असल्याचे सांगितले. पक्षाबाहेर असतानाही त्यांच्याविषयी आदर कायम असल्याचे त्यांनी नमूद केले आणि पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.