मुंबई,
Gyanbharatham for manuscript preservation भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेतील हस्तलिखितांचा वारसा जतन करणे आणि त्यांचे संवर्धन सुनिश्चित करणे या उद्देशाने केंद्र सरकारने 'ज्ञानभारतम्' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत देशभर हस्तलिखितांचे सर्वेक्षण करण्यासाठी मोहिमेला सुरुवात झाली असून नागरिकांना आपल्याकडे असलेली हस्तलिखिते 'ज्ञानभारतम्' मोबाईल अॅपवर नोंदवून राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारताला हस्तलिखितांचा मोठा वारसा लाभला आहे, पण सध्या ही माहिती विखुरलेल्या स्वरूपात उपलब्ध आहे.
पुणे आणि नागपूरमध्ये विशेष केंद्रे स्थापन
केंद्र सरकारचे उद्दिष्ट सर्व ज्ञानसंग्रह एका व्यासपीठावर आणणे आहे. यासाठी 'नॅशनल डिजिटल रिपॉझिटरी' तयार करण्याचे नियोजन आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये आणि खाजगी संग्राहकांकडे असलेल्या अंदाजे एक कोटीहून अधिक हस्तलिखितांची नोंदणी करणे अपेक्षित आहे. या नोंदणीनंतरही हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्थांकडे किंवा व्यक्तीकडेच राहणार आहे. शासनाकडे सुपूर्द करायची इच्छा असेल, तरच ती स्वीकारली जाईल. महाराष्ट्रात या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुणे आणि नागपूरमध्ये विशेष केंद्रे स्थापन केली आहेत.
मंदिरे, मठ, धार्मिक संस्थानांना आव्हान
नागपूरमधील कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था 'क्लस्टर केंद्रे' म्हणून कार्य करतील, तर पुण्यातील आनंद आश्रम संस्थान आणि भारत इतिहास संशोधक मंडळ 'स्वतंत्र केंद्रे' म्हणून काम पाहतील. राज्यस्तरावर या प्रकल्पासाठी 'पुराभिलेख संचालनालय' हे राज्य नोडल संस्था म्हणून काम पाहणार असून, संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले हे राज्य नोडल अधिकारी म्हणून कार्य करतील. मोहिमेला गती देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यात नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्हास्तरीय समित्या स्थापन करून स्थानिक मंदिरे, मठ, धार्मिक संस्था आणि खाजगी संग्राहक यांना सर्वेक्षणात सहभागी करणे ही जबाबदारी प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.