'भाईला बाई करू...', DCP रावले यांच्या वक्तव्यामुळे वाद

अवैध धंद्यांवर कारवाईचा इशारा

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
पुणे,
krishikesh-ravale : पुण्यातील एका सामाजिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे पोलिस उपआयुक्त कृषिकेश रावले हे चर्चेत आले आहेत. अवैध धंद्यांवर कारवाईबाबत बोलताना त्यांनी “भाईला बाई करू” असे वक्तव्य केल्याने काही काळ कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

pune 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील परिमंडळ १ चे उपआयुक्त कृषीकेश रावले हे एका सामाजिक कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांबद्दल चिंता व्यक्त केली.
गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेताना त्यांनी अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. याच वेळी बोलताना त्यांच्या तोंडून “हा भाई, तो भाई… सगळ्या भाईला बाई करू” असे वक्तव्य निघाले. मात्र, लगेचच त्यांनी स्वतःची चूक लक्षात घेतली आणि स्पष्ट केले की, महिलांबद्दल कोणताही अपमानास्पद हेतू नव्हता. गुन्हेगारांना ‘भाई’ म्हणून संबोधले जाते, त्याच संदर्भात हे बोलणे झाले, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या तरुणांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले. अशा युवकांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून त्यांचे समुपदेशन केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या वक्तव्यावर टीका केली आहे, तर काहींनी ते हलक्याफुलक्या स्वरूपात घेतले आहे. पुणे पोलिसांकडून गुन्हेगारीविरोधात कारवाईचे आश्वासन दिले जात असतानाच या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.