गोंदिया,
lakhansinh-katre : मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च व मान्यताप्राप्त संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारी मंडळावर विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी म्हणून अॅड. लखनसिंह कटरे यांची नवनिर्वाचित सभासद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी आज अधिकृतरीत्या ही घोषणा केली.

अॅड. लखनसिंह कटरे हे साहित्य, समाजकार्य आणि विधी क्षेत्रात सक्रिय व बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी तसेच प्रादेशिक बोलीभाषांच्या जतनासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक भान, प्रशासनिक दृष्टिकोन आणि वैचारिक सुस्पष्टता प्रकर्षाने दिसून येते. विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी म्हणून त्यांची ही नियुक्ती विदर्भातील साहित्यिक चळवळीला नवे बळ देणारी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. महामंडळाच्या कार्यकारी मंडळावर कार्य करताना ते मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विविध साहित्यप्रवाहांना एकत्रित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल ज्येष्ठनागरीक सेवा सघं तसेच साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून अॅड. कटरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.