चंदीगढ,
Land granted to Rampal पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रामपाल यांना देशद्रोहाशी संबंधित प्रकरणात जामीन मंजूर करत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जवळपास अकरा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या रामपाल यांना मिळालेल्या या दिलासामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या ते हरियाणातील हिसार येथील कारागृहात बंद आहेत. २०१४ साली हरियाणातील बरवाला येथील सतलोक आश्रमात प्रशासन आणि रामपाल यांच्या अनुयायांमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणानंतर देशद्रोहासह विविध गंभीर आरोपांखाली रामपाल यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली होती.

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला, तरी रामपाल यांची तात्काळ सुटका होणार की नाही, हे त्यांच्या विरोधातील इतर प्रकरणांच्या स्थितीवर अवलंबून राहणार आहे. विविध न्यायालयांमध्ये अनेक खटले प्रलंबित असल्याने, त्यांना जामिनाच्या अटींचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. प्रशासनही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. रामपाल हे सतलोक आश्रमाचे प्रमुख असून त्यांच्या अनुयायांचा मोठा समुदाय देशभर पसरलेला आहे. त्यांच्या शिकवणुकीत त्यांनी धार्मिक ग्रंथांचे स्वतःच्या पद्धतीने स्पष्टीकरण देत आध्यात्मिक विचार मांडले आहेत. ते संत कबीर यांच्या शिकवणीचा प्रसार करत असल्याचा दावा करतात. आध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी शासकीय विभागात अभियंता म्हणूनही काम केले होते.