मला गुजरातच्या लोकांबद्दल आदर आणि मागितली माफी!

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
 नवी दिल्ली,
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. खडगे म्हणाले की, त्यांच्या वक्तव्याचा हेतुपुरस्सर चुकीचा अर्थ लावला जात आहे, तरीही त्यांनी खेद व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, गुजरातच्या लोकांबद्दल त्यांच्यात नेहमीच आदर आहे आणि त्यांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. खडगे यांनी सोशल मीडियावर लिहिले,केरळमधील माझ्या निवडणूक भाषणातील काही वक्तव्यांचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. तरीही, मी जबाबदारीने माझा खेद व्यक्त करतो. गुजरातच्या लोकांबद्दल माझ्या मनात नेहमीच सर्वोच्च आदर होता आणि राहील.
 
 
Mallikarjun Kharge
 
काँग्रेस प्रचारादरम्यान खडगे यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आणि म्हटले होते, "मोदीजी, तुम्ही गुजरातच्या निरक्षर लोकांना फसवू शकता, पण केरळच्या लोकांना फसवू शकत नाही." या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तीव्र निषेध केला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितले की, खडगे यांनी केवळ गुजरातच्या जनतेचाच अपमान केला नाही, तर महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमीच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचवला आहे. त्यांनी या वक्तव्यांना अत्यंत आक्षेपार्ह आणि दुर्दैवी ठरवले.
गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, खडगे यांच्या वक्तव्यांनी ६.५ कोटी गुजरातींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी आरोप केला की, अशा वक्तव्यांमधून काँग्रेस पक्षाच्या मनात गुजरात आणि गुजरातींबद्दल असलेला द्वेष दिसून येतो. संघवी म्हणाले, राजकारणात मतभेद असू शकतात, पण राज्यातील नागरिकांचा अपमान करणे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे असभ्य आहे आणि काँग्रेस पक्षाच्या मानसिकतेचे प्रदर्शन आहे.