शंभर वर्षांच्या प्रवासाचे श्रेय जनता, समाज व देशाला

-नाव सुवर्णाक्षरात कोरायचे नाही -सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे सुस्पष्ट प्रतिपादन -‘राष्ट्र स्वराधना’ हस्तलिखित ग्रंथाचे प्रकाशन

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
नागपूर, 
mohanji-bhagwat : रा.स्व. संघ आज शताब्दी साजरी करतो आहे. मात्र, या शंभर वर्षांच्या प्रवासाचे श्रेय जनता, समाज व देशाला जाते. संघाचा उद्देश आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरण्याचा नाही, असे सुस्पष्ट प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज येथे केले.
 
 
 
08-april-20
 
 
 
संघाचे संपूर्ण कार्य स्वयंसेवकांच्या परिश्रमानेच उभे झाले आहे. कुणाच्या कृपेने नाही. कुणाच्या अवकृपेने थांबलेलेही नाही. याचे कारण, संघाला आपले मानून संघाच्या विचारानुसार व राष्ट्राचे एक स्वरूप उभे करण्यास सर्व स्वयंसेवकांनी आपली संपूर्ण शक्ती लावली आहे. त्यामुळे 100 वर्षे पूर्ण करून संघ देशातील दिशादर्शन करणाऱ्या शक्तीचे रूप घेऊन उभा आहे. हा प्रवास इतिहास म्हणून लिहिला तर रोमांचकारी आहेच. तो उद्बोधकही आहे, असे ते म्हणाले.
 
 
घोष पथकाच्या इतिहासावर आधारित ‘राष्ट्र स्वराधना’ या हस्तलिखित ग्रंथाचे प्रकाशन रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात बुधवारी सायंकाळी झाले. विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सह-संघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, संघाच्या घोष दलामध्ये विविध वाद्ये असून त्यांचे सूर व नाद वेगवेगळे असूनही स्वयंसेवक एकाच तालावर संचलन करतात. यामुळे समन्वय व एकतेची भावना निर्माण होते. जेव्हा कोणतेही कार्य पूर्ण मनाने व पूर्ण भक्तीने केले जाते, तेव्हा त्याचे फळ त्याच स्वरूपात प्रकट होते व सत्यम-शिवम-सुंदरमचा अनुभव येतो. समाज व राष्ट्रात सत्यम, शिवम, सुंदरम स्थापित करणे हे संघाचे ध्येय आहे.
 
 
संघाच्या सर्व कार्यक्रमांचा उद्देश मूल्यांची जोपासना करणे हा आहे. सशक्तशरीर व सुसंस्कृत मन यांच्या समन्वयातून दर्जेदार जीवनाकडे प्रगती करणे हे ध्येय आहे. या संदर्भात, ‘राष्ट्र स्वराधना’चा हा हस्तलिखित इतिहास अत्यंत महत्त्वाचा आहे.
 
 
काळ पुढे जातो, कार्य स्थापित होते, परंतु सुरुवातीला असलेला मूलभूत गुण टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. आम्ही कठीण परिस्थितीत व कोणत्या उद्देशाने हे कार्य कसे स्थापित केले, याची ही हस्तलिखित पुस्तिका सतत आठवण करून देईल.
 
 
स्वयंसेवक व्यावसायिक गायक किंवा वादक नसतानाही, समोर कागदाचा तुकडाही नसताना व आपली दैनंदिन कामे सांभाळत इतक्या रचना कशा सादर करतात, हे पाहून लोकांना आश्चर्य वाटते. संघाचा उद्देश चमत्कार घडवणे नाही. त्या गोष्टी आपोआप घडतात. या रचनांमध्ये माजी स्वयंसेवकांचे सद्गुण प्रतिबिंबित होतात. जेव्हा वादक मनापासूनच्या भक्तीने वादन करतो, तेव्हाच ती भावना होते. हे केवळ एक कर्तव्य नसावे, तर आत्म्याशी जोडलेली बाब असावी.
 
 
समाजाला एकसंघ करण्याचे ध्येय गाठण्यासाठी अधिक संघटित आणि व्यापक प्रयत्नांची गरज आहे. संघाची शताब्दी हा अविरत कार्याचा उत्सव नसून, आत्मपरीक्षणाची एक संधी आहे, आपल्या पूर्वजांचे स्मरण करून अधिक प्रगत अवस्थेकडे वाटचाल करण्याची. आजच्या स्वयंसेवकांचीही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या पूर्वजांच्या कार्याचे मूल्यांकन करावे, स्वतःची त्यांच्याशी तुलना करावी व पुढे वाटचाल करावी. केवळ आपल्या पूर्वजांनी केलेले कार्य जतन करू नये, तर ते अधिक प्रगत स्वरूपात पुढे न्यावे, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.