मुंबई,
No work, no position - Shinde उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नव्याने नियुक्त संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुखांसह ऑनलाईन बैठक घेत पक्ष संघटनेची सविस्तर पाहणी केली. बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला की काम नाही तर पदही राहणार नाही. मंत्री, आमदार किंवा खासदार पद असूनही सर्वांनी कार्यकर्त्यांप्रमाणे मैदानात उतरून काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.एकनाथ शिंदेंनी प्रत्येक संपर्क प्रमुखाला थेट प्रश्न विचारत त्यांच्या कामाचा अहवाल मागविला. किती कार्यकर्ते नियुक्त केले, किती वेळा मतदारसंघात भेटी दिल्या, किती बैठका घेतल्या याची माहिती विचारण्यात आली. कामगिरी समाधानकारक नसल्यास त्वरित कारवाई होईल असा इशारा देखील त्यांनी दिला.
नियमित अहवाल देणे बंधनकारक
संपर्क प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी नियमित अहवाल देणे बंधनकारक ठरवण्यात आले. कामाची अपडेट न मिळाल्यास थेट कारवाई केली जाईल, तसेच प्रत्येक बैठकीचे फोटो आणि तपशील रोज सादर करणे आवश्यक आहे.मतदारसंघांचे संभाव्य विभाजन लक्षात घेऊन प्रत्येक मतदार यादीतून दोन कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्यांच्यासोबत नियमित बैठक घेण्याचे आदेश देखील दिले गेले. निवडणुका नसल्यामुळे एकनाथ शिंदेंचे संपूर्ण लक्ष पक्ष संघटना वाढीवर असून, महाराष्ट्रातील सर्व ४३ हजार गावांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व दृश्यमान करावे, असा स्पष्ट आदेश दिला आहे.
काम न करणाऱ्यांना थेट कारवाई
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीप्रमाणे, जे पदाधिकारी काम करतील तेच मोठ्या पदांवर राहतील, तर काम न करणाऱ्यांना थेट कारवाई केली जाईल. पुण्यातील शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली गेली असून, यापासून राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांनाही स्पष्ट संदेश पोहोचला आहे.एकनाथ शिंदे स्वतः पक्ष विस्ताराचे काम पाहणार असून सर्व पदाधिकाऱ्यांच्या तसेच आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत. जे कार्यकर्ते पक्षाच्या कामात प्रामाणिकपणे योगदान देतील, त्यांनाच पुढील मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, असे संकेत शिंदेंनी दिले आहेत.