तुकाराम मुंढेंच्या बदलीविरोधात दिव्यांगांचा मोर्चा

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
नांदेड,
Protest against Tukaram Mundhe's transfer महाराष्ट्रातील आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंच्या दिव्यांग कल्याण विभागातील सचिव पदावरून झालेल्या बदलीच्या निर्णयाविरोधात आज नांदेडमध्ये दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. तुकाराम मुंढे यांची बदली रद्द व्हावी, अशी जोरदार मागणी मोर्चात सहभागी लोकांनी केली.दिव्यांग बांधवांनी घोषणांसह कार्यालय परिसर दणाणून निघाला, तर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील मंत्रालय परिसरातही तुकाराम मुंढेंच्या बदलीविरोधात आंदोलन करण्यात आले होते.
 
 
munde
 
राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेतला असून मंगळवारी ११ अधिकाऱ्यांच्या बदलीची घोषणा केली. गेल्या आठवड्यात तब्बल २५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. तुकाराम मुंढे यांना दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली आहे. मात्र, दिव्यांगांसाठी त्यांनी सचिव पदावर असताना घेतलेल्या निर्णयांमुळे दिव्यांग बांधव त्यांच्या बदलीला विरोध करत आहेत आणि त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी करत आहेत.
 
 
नांदेडमध्ये विधिमंडळ अंदाज समितीच्या बैठकीदरम्यान दिव्यांग बांधव तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून आक्रमक झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर काही दिवसांतच त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. ते सध्या आपल्या मूळ गावी असून बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना येथे आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आईच्या अस्थींचे विसर्जन करत त्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण आणि विवेक यांचा संदेश समाजाला दिला. अद्याप ते नवीन पदावर पोहचलेले नाहीत आणि पदभार स्वीकारलेले नाही.