आर्वी,
pulgaon arvi warud railway line पुलगाव-आर्वी-वरूड रेल्वे मार्गाच्या ब्रॉडगेज परिवर्तनाच्या कामावरून सध्या आर्वी मतदारसंघात जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला आहे. या प्रकल्पासाठी आधीच मंजूर झालेल्या निधीचा गाजावाजा करून खासदार अमर काळे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका आता सर्वसामान्यांमधून होऊ लागली आहे. रेल्वे मंत्रालयाने हा निधी १ ऑगस्ट २०२४ रोजीच मंजूर केला असताना, २०२६ मध्ये त्याचे श्रेय घेण्याची खासदारांची धडपड चर्चेचा विषय ठरली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर एप्रिल २०२४ मध्ये तळेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली होऊन ऑगस्ट २०२४ मध्ये पहिल्या लाईनच्या सर्वेक्षणाचे टेंडरही काढण्यात आले होते. ज्या कामाची तांत्रिक प्रक्रिया दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली आहे, त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आता खासदारांनी बंद करावा, असा सूर मतदारसंघात उमटत आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार सुमित वानखेडे म्हणाले की, या प्रकल्पासाठी गेल्या आर्थिक वर्षात (२०२५-२६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मुहूर्तमेढ २.५ कोटी रुपयांचा निधी मंजुरीने झाली.pulgaon arvi warud railway line विशेष म्हणजे, यंदाच्या अर्थसंकल्पातही उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा २.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
उपलब्ध कागदपत्रांनुसार, खासदार अमर काळे यांनी केलेला दावा फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. आधीच मंजूर कामांचे आयते श्रेय लाटणे म्हणजे केवळ ‘शिळ्या कढीला ऊत’ आणण्यासारखा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया जनतेतून व्यत होत आहे. खोटे दावे करून लोकांची दिशाभूल करू नये, अशी अपेक्षाही यानिमित्ताने व्यत केली जात आहे.