भंडारा,
black chital spotted सध्या उमरेड–पवनी–कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव प्रेमींसाठी पर्वणीचे क्षण चालून येत आहे. एका वाघिणीचे कुटुंबं मागील आठवड्या पासून पर्यटकांना आनंद देत असताना, आणखी एक अत्यंत उत्साहवर्धक घटना समोर आली आहे. पवनी गेट सफारी दरम्यान जंगल परिसरात एका दुर्मिळ कृष्णवर्णीय चितळाने (मेलीनिस्टिक डियर )पर्यटकांना दर्शन दिले आहे.
ही दुर्मिळ घटना पवनी पर्यटन प्रवेशद्वारावरील मार्गदर्शक दिनेश डहारे यांनी सफारी दरम्यान कॅमेऱ्यात टिपली. नेहमीप्रमाणे तपकिरी रंग व पांढरे ठिपके असलेल्या चितळांच्या कळपात हा गडद काळसर रंगाचा चितळ दिसून आल्याने पर्यटक आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, या चितळामध्ये कृष्णवर्णीयता नावाची दुर्मिळ आनुवंशिक अवस्था आढळते. या अवस्थेमुळे शरीरातील मेलॅनिन रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असल्याने प्राण्याचा रंग सामान्यापेक्षा गडद किंवा जवळपास काळा दिसतो. वन्य अवस्थेत चितळांमध्ये अशा प्रकारची रंगवैविध्यता अत्यंत दुर्मिळ मानली जाते.
याबाबत माहिती देताना उमरेड पवनी कऱ्हाडला वन्यजीव अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक संदीप भारती यांनी अशा दुर्मिळ रंगवैविध्य असलेल्या वन्यप्राण्यांचे दर्शन होणे हे अभयारण्यात असलेल्या समृद्ध जैवविविधतेचे आणि सुरक्षित अधिवासाचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.
उमरेड–पवनी–करहांडला परिसर हा दाट जंगल, गवताळ प्रदेश आणि जलस्रोतांनी समृद्ध असून येथे चितळ, सांबर, रानडुक्कर यांसारख्या शाकाहारी प्राण्यांची मोठी संख्या आढळते. हेच प्राणी वाघ आणि बिबट्यासारख्या भक्षकांसाठी महत्त्वाचा आहारस्रोत ठरतात.
या दुर्मिळ कृष्णवर्णीय चितळाच्या छायाचित्रामुळे वन्यजीवप्रेमी, छायाचित्रकार आणि संशोधकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून या घटनेची नोंद वन विभागाने केली आहे. भविष्यातही या परिसरातील वन्यजीव हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.