शेट्टी गँगच्या सराईत आरोपीस नागपुरातून अटक

-घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस -112 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर, 
shetty-gang : सावली व मूल परिसरात घडलेल्या घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने शेट्टी गँगशी संबंधित अट्टल गुन्हेगारास अटक केली आहे. नागपूर येथून आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे 112 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत 16 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेठ उर्फ रमेश वेलादन शेट्टी (रा. चंद्रपूर, ह. मु. दिघोरी, नागपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
 
 

GANG 
 
 
 
सावली व मूल परिसरात घडलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पृष्ठभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा व सावली पोलिस ठाणे यांनी संयुक्तरित्या तपास सुरू केला होता. दरम्यान, 3 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिकारी व कर्मचार्‍यांचे विशेष पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले. तपासादरम्यान घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार शेठ उर्फ रमेश वेलादन शेट्टी यास ताब्यात घेण्यात आले.
 
 
तपासादरम्यान आरोपीने सावली पोलिस ठाणे व मूल पोलिस ठाण्यांतर्गत घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये कलम 305 (अ) व 331 (4) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. आरोपीने चोरी केलेले सोन्याचे दागिने नागपूर येथील तीन सोनारांकडे विक्री केल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संबंधित सोनारांकडून सोन्याच्या दागिन्यांची लगड जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांचे एकूण वजन 112 ग्रॅम असून, त्यांची अंदाजे किंमत 16 लाख 80 हजार रुपये आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.