लोकशाही बळकटीसाठी एसआयआर अभियान-आ. बकाने

देवळी-पुलगाव मतदारसंघात मतदार यादी अचूकतेसाठी विशेष भर

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
देवळी,
SIR for strengthening democracy भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने देवळी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादीची विशेष सखोल पुनर्तपासणी (एस. आय. आर.) अभियानाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. या अभियानांतर्गत देवळी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व अद्ययावत होण्यास मदत होणार असून लोकशाही अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन आ. राजेश बकाने यांनी केले. पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत आयोजित या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीएलए विधानसभा प्रमुख किरण उरकांदे, भाजपा संघटन महामंत्री उपेंद्र कोठेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खा. सुरेश वाघमारे, माजी खा. रामदास तडस, जिल्हा संयोजक अतुल तराळे, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, मिलिंद भेंडे व नाना ढगे उपस्थित होते.
 
 
 
SIR for strengthening democracy
 
आ. बकाने म्हणाले, मतदार यादी ही लोकशाहीची पायाभूत रचना आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव यादीत समाविष्ट होणे आणि अपात्र अथवा दुप्पट नावे वगळली जाणे आवश्यक आहे. एस. आय. आर. अभियानाच्या माध्यमातून ही प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवली जाणार असून, देवळी-पुलगाव मतदारसंघात याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. कार्यकर्ते हेच पक्षाचे खरे बळ असून त्यांच्या निःस्वार्थ सेवेमुळेच सक्षम नेतृत्त्व निर्माण होते. प्रत्येक कार्यकर्त्याने समाजहितासाठी काम केल्यास राष्ट्रनिर्मिती अधिक मजबूत होईल. एस. आय. आर. अभियानांतर्गत गावपातळीवर जनजागृती, विशेष शिबिरे आणि घरपोच संपर्क मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून अचूक व अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही आ. राजेश बकाने यांनी सांगितले.यावेळी उपस्थितांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बळकटी, तसेच बूथस्तरावरील कामकाज अधिक सक्षम करण्यावर विशेष भर दिला. कार्यशाळेत सर्व मंडळ अध्यक्ष, भाजपा बूथ प्रमुख, बीएलओ, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी, तसेच देवळी-पुलगाव येथील नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.