मेळघाटातून सालई डिंकाची तस्करी सुरूच

-बारातांडा नाक्यावरुन मध्य प्रदेशात वाहतूक -विषारी इंजेक्शन टोचून काढतात डिंक

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
धारणी, 
smuggling-of-salai-gum : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सालई डिंकाचे संग्रहण, विक्री, वाहतूक, खरेदी आणि झाडातून डिंक काढण्यावर ‘सुप्रिम’ बंदी असताना सुद्धा मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्प व प्रादेशिक वनविभागाच्या सुसर्दा व रेल्वे धुळघाट वनपरिक्षेत्रातील जंगलात अवैध व अवैज्ञानिक पद्धतीने सालई डिंक काढणे सुरूच आहे. गावागावात संग्रहण करुन बारातांडा नाक्यातून मध्य प्रदेशात विक्री होत आहेत. सात दिवसात खकनार (म. प्र.) भागात म. प्र. वनविभागाने एक हजार किलो पेक्षा जास्त सालई डिंक जप्त केला आहे.
 

K 
 
 
 
धारणी तालुक्यातील सुसर्दा, शिवाझिरी, राणीगाव, गोलाई, बारातांडा, बिरोटी, भवर, दादरा, भादुबल्डा, सावलीखेडा, रेल्वे तलई, डाबका आणि चिखलदरा तालुक्यातील पूनर्वसित झालेल्या बारुखेडा, अमोना, केलपाणी, सोमठाणा व वानच्या जंगलात यावेळी सालईच्या झाडातून अवैध व अवैज्ञानिक पद्धतीने डिंक (गोंद) काढला जात आहे. सालईच्या नैसर्गिक झाडांना विषारी रासायनिक द्रव्याचे इंजेक्शन टोचून भरभर डिंक काढण्याची पद्धत डिंक तस्करांनी सुरू केल्याने सालई झाडांवर मानवनिर्मित संकट कोसळलेले आहे. विषारी इंजेक्शनमुळे डिंक लवकर व जास्त मिळतो. मात्र, झाडांचे वय कमी होऊन वाढ खुंटत असल्याने दुर्मिळ सालईचे झाड समाप्त होण्याच्या मार्गावर लागलेले आहे.
 
 
एका माहितीनुसार, धारणी तालुक्यातील बारातांडा वन विभागाच्या नाक्यापासून अगदी जवळ असलेल्या खकनार तालुक्यातील बोरखेडा गावाजवळ एक पिकअप वाहन रोखून वन विभागाने (म. प्र. बुरहानपूर वन विभाग) ८ क्विंटल ४५ किलो प्रतिबंधित सालईचा डिंक पकडला होता. खकनारच्या जवळ या मेळघाटच्या जंगलातूनच हे डिंक एकत्रित झाल्याचा संशय आहे. बारातांडा नाक्यावरुन राणीगाव, धुळघाट, गोलाई, शिवाझिरी, बिरोटी येथून संकलित केलेले डिंक मध्य प्रदेशात दुचाकी व पिकअपद्वारे अवैधपणे पोहचविण्यात येत असते. दोन आठवड्यापूर्वी मुर्गीवाला नावाने प्रसिद्ध तस्कराने पिकअपमधून अवैध वाहतूक केल्याची माहिती आहे.
 
 
मध्य प्रदेशात आता बंदी
 
 
मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यातील खकनार विभागाच्या जंगलात सालई डिंक काढत झाडांचे जिवन संपविण्यात आलेले होते. परिणामी न्यायालयाने बंदी घालून प्रतिबंधित केलेले होते. तेव्हापासून मध्य प्रदेशच्या तस्करांनी मेळघाटवर लक्ष केंद्रीत केल्याची माहिती आहे. स्थानिक लोकांना मजुरीवर धरुन सालईच्या झाडांना इजा करुन डिंक संकलित केले जाते व दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने तुकईथड, खकनार (म. प्र.) पर्यंत वाहतूक करुन तस्करी केली जाते. मात्र, वन विभाग व धुळघाट रेंजकडून कारवाई केली जात नाही, हे विशेष! ज्या ज्या जंगलात सालईची झाडे आहेत, त्या त्या जंगलात सर्वेक्षण करुन इंजेक्शन लावलेली झाडे मोजण्याची गरज आहे. वनरक्षक, वनपाल, वनमजुर यांनी आपापल्या वनखंडात गस्त लावून चिरे लावलेले सालई व इतर डिंकाची झाडे पाहण्याची मागणी असून झाडांना संरक्षण देण्याची योजना प्रादेशिक व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव विभागाद्वारे अंमलात आणण्याची गरज आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळेच मेळघाटातील चंदन, तिखाडी, चारोळी, आवळासह विविध वनोपज संपलेल्या आहेत. कमीत कमी सालई व धावडाच्या झाडांना संरक्षण देण्यासाठी तस्करीवर नजर ठेवण्याची गरज आहे.