वेध
गिरीश शेरेकर
deserted place एकांतवास मिळावा म्हणून प्रेमीयुगुलांचे निर्जनस्थळी फिरण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. काहीवेळा त्यांचे फिरणे अगदी सहजतेने होते तर बहुतांशवेळा त्यात अडचणी येतात. त्यातली काही प्रकरणे सहज निकाली निघतात तर काही जीवावर बेतणारी किंवा आयुष्याच्या वाटचालीला गालबोट लावणारी ठरतात. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात असे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. राज्यभरात होणाऱ्या एकूण घटनांपैकी अंगावर बेतणाऱ्या गंभीर घटनांचीच बातमी फक्त होते म्हणून ते चव्हाट्यावर येतात. उर्वरित 95 टक्केघटना तर बदनामीच्या भीतिपोटी समोरच येत नाही. दोन सज्ञान व्यक्ती परस्पर संमतीने एकत्र जाऊ-येऊ शकतात. बसून बोलूसुद्धा शकतात. यात सांगायचा मुद्दा इतकाच की, अनेक युगुलांना सुरक्षित व असुरक्षित ठिकाण कोणते, हेच समजत नाही. शहराला लागून असलेले जंगल क्षेत्र, छोट्या टेकड्या, तलाव हेच त्यांना एकांतवासाची चांगली ठिकाणे वाटतात. पण, दुसऱ्या बाजूने लूटमार, चोऱ्याचपाट्या आणि अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची पण ठिकाणे हीच असतात. हे भामटे कायम शिकार शोधत असतात. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उपरोक्त ठिकाणी जाणारे युगुल त्यांच्या जाळ्यात सहज अडकतात. त्यांच्या मागण्या अमर्याद असतात आणि यांना बदनामीची भीती असल्याने ते पूर्ततेला तयार होतात.
अमरावती शहराला लागून असलेल्या भानखेडा जंगल परिसरात अशीच एक घटना नुकतीच रात्रीच्यावेळी घडली. अतिशय संतापजनक ही घटना असून प्रेमात आंधळे झालेले युगुल किती बिनधास्त असते याचे ते उदाहरण आहे. ज्या भानखेडा जंगल भागात हे युगुल गेले होते, तो भाग कायम निर्जन असतो आणि युगुलांसाठी तर फारच धोकादायक आहे. त्यातही रात्रीची वेळ असेल तर सांगायचीच गरज नाही. येथे वन्यप्राण्यांचाही वावर असतो. इतकी भयानक स्थिती असताना युगुलांनी तेथे रात्रीच काय दिवसा तरी जावे का? याचे उत्तर नाही असेच आहे. प्रेम आंधळे असले तरी ते कुठेही जाऊन व्यक्त करायचे नसते आणि केले तर काय होते, हे अमरावतचीच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे. यातले युगुल जेमतेम सज्ञान झाले. पण, ते हिंमतबाज आहे ही जमेची बाजू ठरली. इतका कठीण प्रसंग त्यांच्यावर ओढवल्यानंतर ते खंबीरपणे कुटुंबीयांपर्यंत पोहोचले. पुढे दवाखाना आणि पोलिसांकडे गेले. त्यामुळे पुढच्या आवश्यक त्या सर्व प्रक्रिया तातडीने करणे दोन्ही यंत्रणांना लगेच शक्य झाले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीचा दिवस करत घटनेत सहभागी पाचही आरोपींना अटक केली. कायद्यातल्या तरतुदीनुसार आरोपींची ओळख परेड झाली आहे. पीडितेने न्यायाधीशांसमोर आरोपींना ओळखले आहे. तपास पूर्ण करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. आरोपींना लवकरच कठोरातील कठोर शिक्षा होईल, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन!
सामूहिक अत्याचाराच्या अशा घटना कोणत्याही शहरासाठी भूषणावह नाहीत. आपले शहर म्हणा किंवा जिल्हा कायम सुरक्षित राहावा, याची जबाबदारी पोलिसांचीच आहे. पण, कुठे जावे आणि कुठे जाऊ नये हे जाणाèयांनी विचारपूर्वक ठरविणे सुद्धा अत्यावश्यक आहे. अमरावतीच्या घटनेतले आरोपी पोलिसांनी ज्या खबरी नेटवर्कमधून ताब्यात घेतले, ते नेटवर्क जर कायमस्वरूपी वापरले तर कोणत्या भागात काय सुरू आहे आणि कुठे सामान्य माणसांना धोका आहे, हे वेळीच लक्षात येऊ शकते. पण, आपल्याकडे घटना घडल्यावरच हातपाय हलविण्याची सवय आहे. ती फक्त पोलिसांनाच नाही. सर्वच विभागात हीच स्थिती आहे. प्रत्येकच घटनेचा दोष शासकीय यंत्रणेवर टाकून जमणार नाही. समाजाची आणि त्यात वावरणाèया व्यक्तींचीपण सर्तकता मोलाची असते. शहाण्या व्यक्तींनी एकमेकांच्या प्रेमात पडणे वाईट नाही आणि त्याला बंधन सुद्धा नाही. फक्त हे प्रेम समजूतदारपणे करणे आणि व्यक्त होणे महत्त्वाचे आहे.deserted place हौस म्हणून ते करण्यासारखे अजिबातच नाही. चूक येथेच होते आणि भलत्याच ठिकाणी जाऊन व्यक्त झाल्यावर संकट कोसळते. ज्यांच्यावर असे कठीण प्रसंग ओढवले आहेत, त्यांना त्या दाहकतेची कल्पना आहे. जे युगुल अशा चक्रव्यूहात अडकले असेल त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. अमरावतीच्या घटनेतून त्यांनी बोध घ्यावा. आयुष्याच्या वाटेवर निर्णय घेताना चांगल्या व वाईट परिणामांची मीमांसा पहिले करावी. करता येत नसेल तर जवळच्या जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. शंभरदा विचार करून कृती करावी आणि धोके टाळावे, हीच अपेक्षा!
9420721225