चिखलदर्‍याच्या गाविलगड किल्ल्याची दुरावस्था

-संवर्धनासाठी शासनाचा हस्तक्षेप आवश्यक -स्वराज्य सेवा प्रतिष्ठानची मागणी

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
अमरावती,
gavilgad-fort : विदर्भातील ऐतिहासिक वारशाचा मानबिंदू असलेल्या चिखलदारा येथील गाविलगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमी व दुर्गप्रेमींकडून स्वराज्य सेवा प्रतिष्ठान मार्फत होत आहे. सध्या किल्ला प्रशासकीय दुर्लक्षामुळे जीर्ण अवस्थेत असून, त्याच्या जतनासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
 
 
JKM
 
 
 
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्याच्या तटबंदीची व आतील इमारती, दरवाजे यांची पडझड रोखण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम हाती घेण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, किल्ल्यावरील पारंपरिक जलव्यवस्था सध्या दुर्लक्षित असून, प्राचीन विहिरी व तलावांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. दरवर्षी लागणार्‍या वणव्यामुळे नैसर्गिक सौंदर्य व ऐतिहासिक अवशेषांचे मोठे नुकसान होत असल्याने आग नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
 
 
पर्यटनाच्या दृष्टीनेही गाविलगड किल्ल्यावर मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो. पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सुरक्षा व्यवस्था तसेच डिजिटल गाईड सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.
 
 
यासोबतच किल्ल्याच्या परिसरात ’गाविलगड रिसर्च सेंटर’ स्थापन करून इतिहास अभ्यासक व विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावे, अशीही मागणी पुढे आली आहे.
 
 
स्थानिक नागरिक व दुर्गप्रेमी संस्थांच्या सहभागातून किल्ल्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊ शकते. यासाठी स्वतंत्र ‘विशेष कृती दल’ स्थापन करण्याची गरज आहे. गाविलगड किल्ला हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून तो विदर्भाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे शासनाने तातडीने ‘गाविलगड विकास आराखडा’ राबवून या वारशाचे संवर्धन करावे, अशी मागणी स्वराज्य सेवा प्रतिष्ठान व स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.