उद्या ‘सायको-ऑन्कोलॉजी’ दिन

-कॅन्सरग्रस्तांना सकारात्मक ठेवण्याची जबाबदारी कुटुंबाची -मानसोपचारतज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांचे आवाहन

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
psycho-oncology-day : कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्णांमध्ये नैराश्य वाढते. त्यामुळे त्यांना आयुष्याबद्दल सकारात्मक ठेवण्याची पहिली जबाबदारी त्यांच्या कुटुंबियांची आहे. कर्करोग हा केवळ शारीरिक आजार नसून तो रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करतो, असे मत मानसोपचार तज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी व्यक्त केले. 9 एप्रिल या ‘वर्ल्ड सायको-ऑन्कोलॉजी’ दिनानिमित्त कर्करोग रुग्णांची मानसिक स्थिती, त्यावरील परिणाम आणि त्यावर मात करण्याविषयी त्यांनी माहिती दिली.
 
 
y8Apr-Shrikant-Meshram
 
 
 
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्णांमध्ये भीती, नैराश्य, असहाय्यता, भविष्याबद्दलची अनिश्चितता आणि मृत्यूची भीती वाढते. उपचार प्रक्रियेदरम्यान केमोथेरपी, शस्त्रक्रिया किंवा दीर्घकालीन औषधोपचारामुळे शारीरिक त्रासासोबत मानसिक ताणही वाढतो. त्यामुळे कर्करोगाच्या उपचारामध्ये मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते.
 
 
या पार्श्वभूमीवर त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कुटुंबियांनी प्राथमिकता दिली पाहिजे. 45 वर्षीय एका महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्यानंतर ती पूर्णपणे खचून गेली होती. मी आता वाचणार नाही असे विचार तिच्या मनात सतत येत होते. मात्र, योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि सकारात्मक विचार यामुळे तिचा आत्मविश्वास हळूहळू वाढला आणि ती उपचार प्रक्रियेला सकारात्मकपणे सामोरी जाऊ लागली.
 
 
कर्करोग रुग्णांनी मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी भावना दडपून न ठेवता व्यक्त करणे, कुटुंबियांनी सहानुभूतीने साथ देणे, नियमित समुपदेशन व मानसोपचार घेणे, ध्यान-योग व श्वसनाचे व्यायाम करणे, सकारात्मक विचार ठेवणे आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कर्करोगाशी लढताना मानसिक बळ ही सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होत असल्याचे डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी स्पष्ट केले.