उभ्या ट्रकवर दुचाकी धडकून दाेन युवक ठार

- दाेघे गंभीर जखमी

    दिनांक :08-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
bike-hits-parked-truck : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव दुचाकी धडकली. या विचित्र अपघातात दाेन युवक ठार झाले तर दाेघे गंभीर जखमी झाले. जखमींवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास कळमना पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतनगर ते विजयवाडा राेडवर लक्ष्मीनगर चाैकात घडला. सूरज भागवत रात्रे (22) आणि बलवंत धीरज बंजारे (40) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. तर देवदास गरीबदास जांगळे (23) आणि महेंद्र दिलीप खिलाडे (25) अशी जखमींची नावे आहेत.
 
 
 
ACCIDENT
 
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 10.30 वाजता देवदास गरीबदास जांगळे (23) आणि त्यांचे तीन मित्र सूरज भागवत रात्रे (22), महेंद्र दिलीप खिलाडे (25) आणि बलवंत धीरज बंजारे (40) हे एका लग्न समारंभातून परतत हाेते. चाैघेही एकाच दुचाकीवर (एमएच 49 सीव्ही 3670) प्रवास करत हाेते. लक्ष्मीनगर चाैकातील लाल स्कूलजवळ सार्वजनिक रस्त्यावर एक आयसर ट्रक (सीजी 08 एएस 8755) काेणतीही खूण लावून न ठेवता रस्त्याच्या कडेला उभा हाेता. भरधाव दुचाकीची या ट्रकच्या मागील भागाला जाेरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण हाेती की, दुचाकीस्वार थेट ट्रकखाली घुसले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात हलवले.
 
 
सूरज रात्रे आणि बलवंत बंजारे यांना मेयाे रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, उपचारादरम्यान डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. देवदास जांगळे आणि महेंद्र खिलाडे हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर मेडिकल रुग्णालयातील ट्राॅमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, रस्त्यावर ट्रॅिफकचे नियम धाब्यावर बसवून आणि धाेकादायक स्थितीत ट्रक उभा केल्यामुळे हा अपघात घडला, अशी तक्रार देवदास जांगळे यांनी दिली आहे. या तक्रारीवरून कळमना पाेलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिस उपनिरीक्षक हनुमंत इंगळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.