पुणे,
pune-accident : वानवडी परिसरात मंगळवारी (दि. ७) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडलेला अपघात परिसरात हळहळ निर्माण करणारा ठरला. गंगा सॅटेलाइट परिसरातील नाल्यावरील पुलाजवळ पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली २४ वर्षीय ग्रासीया डोरा या तरुणीचा मृत्यू झाला.
घटना अशी घडली की, नेताजीनगरजवळून पाणी भरायला जात असलेला टँकर डावीकडे वळत असताना दुचाकीवरून नांदेड सिटीला जात असलेली तरुणी धडकली. अपघातानंतर ती टँकरच्या पुढील चाकाखाली आल्याने जागीच ठार झाली. प्राथमिक तपासात असे लक्षात आले की, तरुणीने हेल्मेट परिधान केले होते, पण अपघाताच्या वेळी हेल्मेट बाजूला गेले असल्यामुळे डोक्यावर गंभीर दुखापत झाली.
टँकर चालक संतोषकुमार मोर्या (वय ४५) पोलिस चौकीत हजर आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. तरुणीच्या कुटुंबियांमध्ये वडील चेन्नईत तर आई व बहीण वानवडीत राहतात.
यापूर्वी दोन दिवसांपूर्वीही क्लाऊड ९ परिसरात १९ वर्षीय फुटबॉलपटू आरीझ शेख याचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता. दोन दिवसांत दोन मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांचा आग्रह आहे की, वानवडी व परिसरातील टँकर, डंपर व इतर अवजड वाहनांवर कडक कारवाई केली जावी, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, तसेच ठिकठिकाणी गतिरोधक उभारून वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.