विदर्भ क्रिकेटचा ‘रणजी किंग’ फैझ फजल उद्या वाशीमममध्ये!

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
नवोदय विद्यालयाच्या खेळाडूंना देणार यशाचा मंत्र
 
वाशीम, 
विदर्भ क्रिकेटला ऐतिहासिक सुवर्णकाळ अनुभवून देणारा माजी कर्णधार आणि सलामीवीर 'Ranji King' Faiz Fazal फैझ फजल हा शनिवार, ११ एप्रिल रोजी वाशीम दौर्‍यावर येत आहे. येथील जवाहर नवोदय विद्यालयात सायंकाळी ६ वाजता आयोजित एका विशेष कार्यक्रमात तो सपत्नीक सदिच्छा भेट देऊन खेळाडूंचा सत्कार करणार आहे, अशी माहिती प्राचार्य सचिन खरात यांनी दिली.
 
 
Faiz Fazal
 
विदर्भ क्रिकेटचा चेहरा मानल्या जाणार्‍या  'Ranji King' Faiz Fazal फैझ फजलने आपल्या नेतृत्वाखाली २०१७-१८ आणि २०१८-१९ अशा सलग दोन वर्षांत विदर्भाला ’रणजी ट्रॉफी’ जिंकून दिली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाने भारतीय क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. खेळाडूंमध्ये खेळाप्रती गोडी निर्माण व्हावी आणि त्यांना योग्य प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या सदिच्छा भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.फैझ फजलने रणजी क्रिकेटमध्ये ७ हजार ६९३ धावांचा डोंगर उभा केला आहे. त्याच्या कारकिर्दीची सुरुवातच धडाकेबाज झाली होती. १७ डिसेंबर २००३ रोजी त्याने रणजी पदार्पणातच १५१ धावांची खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर २०१६ मध्ये त्याने हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना भारतीय संघात (आंतरराष्ट्रीय क्रिकेट) पदार्पण केले. विदर्भ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आणि विशेषाधिकार आहे, अशा भावना त्याने नेहमीच व्यक्त केल्या आहेत.वाशिम जिल्ह्यासाठी हा सोहळा अत्यंत खास ठरणार आहे. एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूला जवळून पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळणार असल्याने, जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य सचिन खरात यांनी केले आहे.