संतांच्या दर्शनाला जाणारा रस्ता झाला संकटाचा दरवाजा!

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
रखडलेला आजनसरा -सिरसगाव मार्ग कधी?
 
आजनसरा, 
Ajansara-Sirasgaon Road आजनसरा-निधा टाकळी सिरसगाव या १० कि.मी. रस्त्याची निर्मिती २५ डिसेंबर २००० रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत करण्यात आली होती. तेव्हापासून या रस्त्याची कोणत्याच प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नाही. दोन आमदारांच्या मतदार संघातून जाणारा हा मार्ग मृत्यूचा मार्ग ठरत आहे. पुरण पोळीच्या नैवेद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या संत भोजाजी महाराजांच्या दर्शनाकडे घेऊन जाणारा हा मार्ग संकटांचा झाला, असे म्हटल्यास चुकीच ठरू नये!
 
 
Road
 
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत तयार करण्यात आलेला रस्ता दुर्लक्षित झाल्याने तो मार्ग शिवपांदनचे वाटू लागला आहे. रस्त्यावरील डांबर आणि गिट्टीचे भांडण झाल्यागत ते वेगवेगळे झाल्याने संपूर्ण मार्गांवर दर्‍या खोर्‍या प्रमाणे मोठमोठाले सुरंग तयार झाले आहेत. या मार्गाने प्रवास करताना हा रस्ता खरच स्वतंत्र भारतातला आहे का असा प्रश्न निर्माण होतो. या मार्गांवरील निधा टाकळी हे गाव रस्त्याअभावी मुख्य प्रवाहपासून दुर फेकल्या गेला असल्याने अनेक गंभीर जिवन मरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. रोजगार, शिक्षण, आरोग्य, विवाह, आदी सर्वच क्षेत्रात गावाकर्‍यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. परिणामी अनेक कुटुंब स्थलांतरीत होत असून विवाहयोग्य मुलांना मुली मिळणे सुद्धा कठीण झाले आहे.
 
 
Ajansara-Sirasgaon Road  टाकळी येथे सातव्या वर्गापर्यंतच शाळा असल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी वडनेर, हिंगणघाट येथे जावे लागते. पण, या मार्गांवरील चालणारी एसटी रस्त्याअभावी पावसाळ्यात बंद होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण सातव्या वर्गापासून बंद होत आहे. त्यामुळे बेटी बचाव बेटी पढाव हे शासनाचे अभियान फेल ठरत आहे. देवळीचे आ. राजेश बकाने यांना रस्ता दुरुस्तीची मागणी केल्यास अर्धा रस्ता हिंगणघाट मतदार संघात येतो असे कारण दिल्या जाते तर आ. कुणावार यांना मागणी केल्यास तो रस्ता देवळीत येतो, असे सांगितल्या जाते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांचा रस्त्याच्या प्रश्न कायमच राहतो. हा मार्ग थेट वर्धा यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा अत्यंत कमी अंतराचा मार्ग आहे. त्यामुळे आजनसरा येथे संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. परंतु, या मार्गाची स्थिती दुर्गम भागातील रस्त्याप्रमाणे झाली असून रस्त्यावर मोठमोठाले खड्डे निर्माण झाले आहेत. पुलांवर आरपार भगदाडं पडल्याने मोठाह अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे या परिसराची ओळख जिल्ह्यातील अत्यन्त मागासलेला भाग म्हणून झाली आहे. प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मिळालेली मान्यता केवळ मृगजळ ठरत आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी केंद्रीय निधीतून रस्त्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन शहरी इंडिया व ग्रामीण भारत यात निर्माण होत असलेली दरी कमी करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी परिसरातील गोरगरीब शेतकरी विद्यार्थी संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी येणार्‍या असंख्य भाविक भक्तांकडून केल्या जात आहे.