अज्ञातावर गुन्हा दाखल
महागाव,
Amani Khurd: Dr. Babasaheb Ambedkar Jayanti तालुक्यातील आमणी खुर्द येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनर काही अज्ञात समाजकंटकांनी दगड मारून फाडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी महागाव पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमणी (खुर्द) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठानच्या वतीने जयंती उत्सवाच्या निमित्ताने मुख्य चौकात बॅनर लावण्यात आले होते. बुधवार, 8 एप्रिलच्या रात्री 9.30 च्या सुमारास कोणीतरी जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने या बॅनरवर दगडफेक केली आणि तेे फाडून विद्रूप केले.
Amani Khurd: Dr. Babasaheb Ambedkar Jayanti बॅनर फाडल्याची कळताच गावातील आंबेडकरी अनुयायांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संघर्ष रोकडे यांनी तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार महागाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 298 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तक्रार देताना प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आशिष काळबांडे, अतुल रोकडे, प्रशांत मोरे, सूरज सांगडे, सम्यक काळबांडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात सपोनि अंबुरे करत आहेत. दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले असून गावात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.