रत्नागिरी
Ashish Shelar कोकणातील प्राचीन कातळशिल्पांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या ऐतिहासिक वारशावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली असून, या प्रकल्पासाठी सुमारे १४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार Ashish Shelar यांनी दिली.
कोकण किनारपट्टीवर आढळणारी कातळशिल्पे ही प्रागैतिहासिक काळातील मानवी जीवन, संस्कृती आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ३०० किलोमीटर किनारपट्टीपैकी सुमारे २५ किलोमीटर परिसरात दोन हजारांहून अधिक कातळशिल्पे सापडली असून, या शिल्पांमधून त्या काळातील जीवनशैलीचे स्पष्ट चित्र उभे राहते. तज्ज्ञांच्या मते, या शिल्पांचा अभ्यास केल्यास मानवाच्या प्राचीन इतिहासाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.प्रस्तावित माहितीपट अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केला जाणार आहे. यामध्ये ड्रोनद्वारे चित्रीकरण, उच्च दर्जाचे छायांकन, सिनेमॅटिक दृश्यरचना आणि आधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय, या प्रकल्पांतर्गत विस्तृत सर्वेक्षण, तज्ज्ञ दिग्दर्शकांची नियुक्ती, ध्वनी संयोजन, संपादन तसेच ‘बिहाइंड द सीन’ सामग्री तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या माहितीपटातून तयार Ashish Shelar होणाऱ्या दृश्यसामग्रीचा वापर डिजिटल माध्यमांवरही केला जाणार असून, कातळशिल्पांचा एक समृद्ध ऑडिओ-व्हिज्युअल संग्रह उभारण्याची योजना आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचा प्रसार देश-विदेशात अधिक प्रभावीपणे होणार आहे.हा माहितीपट आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार केला जाणार असून, कोकणातील कातळशिल्पांना जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळवून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पाची जबाबदारी राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडे सोपवण्यात आली आहे.या उपक्रमामुळे कोकणातील ऐतिहासिक वारशाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळण्याबरोबरच पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.