भाजपाचा 46 वर्षांचा गौरवशाली प्रवास

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
दिल्ली वार्तापत्र
bjps journey भाजपाचा 46 वा स्थापना दिन समारंभ 6 एप्रिलला देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाचा गेल्या 46 वर्षांचा हा प्रवास मोठा लक्षवेधी, उल्लेखनीय आणि अतिशय अभिमानास्पद असा आहे. 2014 पासून सलग तीन लोकसभा निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत, देशातील 21 राज्यांत आज भाजपाची वा भाजपा आघाडीची सरकारे आहेत.  भारतीय जनता पक्ष हा देशातीलच नाही तर जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष झाला आहे, देशातील सर्वांत श्रीमंत राजकीय पक्ष म्हणूनही भाजप ओळखला जातो. सदस्यसंख्येच्या बाबतीत चीनमधील कम्युनिस्ट पक्ष हा आतापर्यंत जगातील सर्वांत मोठा पक्ष होता, आता भाजपाने चीनच्या कम्युनिस्ट पक्षालाही मागे टाकले आहे.
 

भाजपाचा 46 वर्षांचा गौरवशाली प्रवास 
 
भाजपाची सुरुवात ही जनसंघापासून झाली आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय हे जनसंघाचे संस्थापक नेते होते. भाजपा कार्यालयातील बॅनरवर आजही डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांची छायाचित्रे आहेत. यावरून आपल्या मूळ पक्षाच्या संस्थापकांबद्दल भाजपला आजही अतिशय आदर असल्याचे तसेच त्यांच्याबद्दल तो कृतज्ञ असल्याचे दिसून येते. 1951 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना झाली, 1977 मध्ये तत्कालीन राजकीय गरज म्हणून जनसंघ जनता पक्षात विलीन करण्यात आला. मात्र नंतर वैचारिक मतभेदांमुळे जनता पक्षातून बाहेर पडत जुन्या जनसंघाच्या लोकांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. जनसंघापासून सुरू झालेला या पक्षाचा राजकीय प्रवास व्हाया जनता पक्ष भाजपपर्यंत पोहोचला आहे. हा प्रवास सोपा नव्हता, तर अतिशय कष्टाचा, संकटाचा आणि हालअपेष्टांचा होता. पण भाजपाचे कार्यकर्ते कधी डगमगले नाहीत, निराश झाले नाहीत.
 
1980 मध्ये भाजपाच्या स्थापनेच्या वेळी पक्षाने गांधीवादी समाजवाद ही मुख्य विचारधारा स्वीकारली होती, त्यानंतर 1985 मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानववादाचा मार्ग भाजपाने पत्करला, जो आजपर्यंत कायम आहे. जनसंघाच्या वेळेला दिवा हे पक्षाचे निवडणूक चिन्ह होते, पण तेव्हा हा दिवा पूर्ण क्षमतेने कधी पेटलाच नाही आणि पेटला तर दीर्घकाळ टिकला नाही. मात्र भाजपाच्या स्थापनेनंतर पक्षाने कमळ हे निवडणूक चिन्ह घेतले, कमळ मात्र देशभर अतिशय जोमाने फुलले. कमळाचा उगम हा चिखलातून होत असतो, भाजपाचे कमळ हे असेच चिखलातून फुलले.
 
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला 2014 नंतर सोन्याचे दिवस आले, पण भाजपाच्या आजवरच्या राजकीय प्रवासात अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे योगदान अनन्यसाधारण म्हणावे लागेल. 1980 पासून 2014 पर्यंत वाजपेयी आणि अडवाणी हे भाजपाचा देशभरातील लोकप्रिय चेहरा होते. भाजपाच्या या प्रवासात डॉ. मुरलीमनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, जन कृष्णमूर्ती, व्यंकय्या नायडू, राजनाथसिंह, नितीन गडकरी, अमित शाह, जे.पी. नड्डा यांचे योगदान तेवढेच मह्त्वाचे आहे. सध्या बिहारचे दमदार नितीन नवीन हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. नितीन नवीन यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे आणि भाजपाचे वय सारखेच आहे. दोघेही समवयीन आहेत.
 
तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या, ए.के. पटेल गुजरातमधून तर जंगा रेड्डी आंध्रप्रदेशच्या हनमकोंडामधून विजयी झाले होते. अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपच्या अन्य सर्व प्रमुख नेत्यांचा तेव्हा पराभव झाला होता. त्यानंतर 40 वर्षानी म्हणजे 2014 मध्ये भाजपाने स्वळावर पहिल्यांदा स्पष्ट बहुमत मिळवले. अटलबिहारी वाजपेयी हे 1996, 1998 आणि 1999 असे तीनदा देशाचे पंतप्रधान झाले, पहिल्यांदा ते 13 दिवसांसाठी, दुसऱ्यांदा 13 महिन्यांसाठी तर तिसऱ्यांदा पाच वर्षासाठी पंतप्रधान होते. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे वाजपेयी दे देशातील पहिले गैरकाँग्रेसी पंतप्रधान होते. नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आतापर्यंत दोन वेळा त्यांनी पंतप्रधान म्हणून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. पंतप्रधान म्हणून पाच वर्षाचा तिसरा कार्यकाळही ते पूर्ण करतील, असा देशातील लोकांचा विश्वास आहे.
 
देशातील 21 राज्यात आज भाजपाची आणि भाजपा आघाडीची सरकारे आहेत. देशात सर्वाधिक म्हणजे 31 वर्षापासून गुजरातमध्ये भाजपाचे सरकार आहे. केशुभाई पटेल हे गुजरातमधील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री होते. सुरेश मेहता, शंकरसिंह वाघेला आणि दिलीप पारेख हे भाजपाचे नंतरचे मुख्यमंत्री होते. 1998 मध्ये केशुभाई पटेल दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. 2001 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर सलग चारवेळा त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काही दिवसांपूर्वी मोदी यांनी सरकारप्रमुख म्हणून सर्वाधिक काळ सत्तेवर राहण्याचा अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंक यांचा 8930 दिवसांचा विक्रम मोडला.
 
गुजरातनंतर मध्यप्रदेशात मधला काही अपवाद वगळता भाजपा 2003 पासून 20 वर्षापेक्षा जास्त काळापासून सत्तेत आहे. हरयाणातही भाजपाने सत्तेवर येण्याची हॅटटिक़ केली आहे. 2027 मध्ये भाजपा उत्तरप्रदेशातही योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात सत्तेवर येण्याची हॅटट्रिक करेल, यात शंका नाही. गोवा, दिल्ली, त्रिपुरा, आसाम, ओडिशा, हरयाणा, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. बिहार, सिक्कीम, मेघालय, नागालॅण्ड. मिझोराम, मणिपूर, आंध्रप्रदेश आणि अरुणाल प्रदेश या राज्यात भाजपाच्या मित्रपक्षांचे मुख्यमंत्री आहेत. बिहारमध्ये आता भाजपाचा मुख्यमंत्री शपथ घेण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे, बिहारमध्ये भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जदयुचे नितीशकुमार मुख्यमंत्री आहेत, पण आता ते राज्यसभेवर निर्वाचित झाल्यामुळे येत्या काही दिवसात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.
आज देशात एकही असे राजकीय पद नाही, ज्यावर भाजपाचा नेता नव्हता. रामनाथ कोविंद हे भाजपाचे पहिले राष्ट्रपती होते, द्रौपदी
 
मुर्मू या भाजपाच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहे. भेरोसिंह शेखावत हे भाजपाचे पहिले उपराष्ट्रपती होते. त्यानंतर व्यंकय्या नायडू, जगदीप धनकड उपराष्ट्रपती झाले, आता सी.पी. राधाकृष्णन हे विद्यमान उपराष्ट्रपती आहेत.bjps journey 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे 240 सदस्य निवडून आले होते. 2019 मध्ये भाजपाचे 303 तर 2014 मध्ये भाजपाचे 282 खासदार निवडून आले होते. रालोआतील मित्रपक्ष मिळून सध्या लोकसभेत भाजपाचे संख्याबळ 295 आहे. राज्यसभेतही भाजपाने खासदारांचे शतक पूर्ण केले असून तेथे भाजपाचे 103 खासदार आहेत. रालोआतील मित्र पक्ष पकडून भाजपा खासदारांची संख्या 133 वर जाते.
देशभरातील सर्व राज्य विधानसभांतील आमदारांची संख्या 4033 आहे, यात भाजपाचे सर्वाधिक म्हणजे 1654 आमदार आहे. 2014 मध्ये देशभरातील भाजपा आमदारांची संख्या 1035 होती, 2025 मध्ये 1654 झाली. 2014 नंतर 2015 चा अपवाद वगळता देभरातील भाजपा आमदारांच्या संख्येत दरवर्षी वाढच झाली आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आटोपल्यावर ही संख्या आणखी वाढेल, यात शंका नाही. देशातील सर्वात वयस्कर पक्ष असलेली काँग्रेस शेवटचे आचके देत असतांना 46 वर्षांच्या तरुण भाजपाचा हा प्रवास नेत्रदीपक आणि सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद असाच म्हणावा लागेल.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
................................................................